‘पुढच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत मेट्रोचं बरंच काम पुर्ण होईल, यामध्ये राजकारण नको’ – उपमुख्यमंत्री पवार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडला. पोलीस मुख्यालय मैदानावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. यावेळी पोलीस संचलन झाले. तसंच पुरस्कार प्रदान देखील करण्यात आले. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियम अटींचे पालन करुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विविध विषयांवर यावेळी अजित पवार यांनी भाष्य केलं. यावेळी पवार म्हणाले, पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोची ट्रायल झाली आहे. यामध्ये राजकारण न आणता सगळ्यांनी साथ दिली तर पुढच्या २६ जानेवारी पर्यंत मेट्रोचे बरेच काम झालेले असेल. कदाचित काही परिसरात मेट्रो सुरु करता येईल. शाळा सुरु व्हाव्यात, विस्कटलेली घडी चांगल्या प्रकारे बसावी यासाठी प्रयत्न करुयात. तसंच भामा आसखेडचं पाणी मिळालेलं आहे, पिण्याच्या पाण्याशिवाय इतर मूलभूत सुविधा देण्याविषयी प्रयत्न सुरु आहे. रिंगरोड, विमानतळ, हे ही प्रश्न लवकर मार्गी लागतील. अशी माहिती देत ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या शुभेच्छा दिल्या.

पुढं त्यांनी काल मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या मोर्चाविषयी वक्तव्य केलं. पवार म्हणाले की, “राज्यपाल शेतकरी नेत्यांना भेटले नाही. या प्रश्नावर पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे राज्यपाल भेटू शकणार नाही, अशी माहिती मला मिळाली. मात्र अशावेळी इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी कार्यक्रम थोडा बदलायचा. कोणाला प्राधान्य द्यायचं हे त्या व्यक्तिवर अवलंबून आहे. जयंत पाटील यांचे दौरे सुरू आहेत तर हे पक्षबांधणीसाठी दौरे आहेत की मध्यावधी निवडणुकांचे संकेत आहेत? या प्रश्नावर ते म्हणाले की, जयंत पाटील हे पक्षबांधणी च्या निमित्ताने फिरताहेत, प्रत्येक नेत्याला पक्ष वाढवण्यासाठी राज्यभर दौरे करावे लागतात.”

दरम्यान, पद्मश्री आणि विविध पुरस्कारांबाबत अजित पवार यांनी अभिनंदन केलं. तसंच, कोरोना संसर्गामुळे यंदा साधेपणाने कार्यक्रम केलेला आहे, कारण अजूनही संसर्ग आहे त्यामुळे संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी विविध प्रयत्न करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.