…म्हणून अजित पवारांनी घेतला यु-टर्न, वाशीहून पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम MMRDAने अचानक रद्द केला. इंदू मिल येथील राष्ट्रीय स्मारकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा पायाभरणीचा कार्यक्रम होणार होता. परंतु निमंत्रणावरुन झालेल्या वादातून हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती आहे. ऐनवेळी कार्यक्रम रद्द झाल्याचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी अजितदादा पुण्याहून मुंबईत येत होते. दुपारी तीन वाजता हा सोहळा होणार होता. मात्र, अचानक हा सोहळा रद्द केल्याची माहिती MMRDA ने दिली. त्यामुळे वाशीपर्यंत पोहचलेले अजित पवार यांनी पुन्हा यु-टर्न घेत पुण्याच्या दिशेने रवाना झाले. आज सकाळी सहा वाजता अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर ते मेट्रो अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर कोरोना बाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

पुणे विधानभवन सभागृहात आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांबाबतची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर, विभागीय आयुक्त, जमावबंदी आयुक्त, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इत्यादी उपस्थित होते.

मुंबई येथील इंदू मिलवरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला केवळ 16 जाणांनाच निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सोबतच सामाजिक न्यायमंत्र धनंजय मुंडे, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि अधिकारी हे उपस्थित राहणार होते.