तक्रार मागे घेण्यासाठी DG संजय पाडेंनी माझ्यावर दबाव आणला – परमबीर सिंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात केलेली तक्रार मागे घ्या, सरकारविरुद्ध उगाच भांडत बसू नका. तुमच्या प्रकरणात मी मध्यस्थी करतो, असे म्हणत पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांनी सीबीआयकडे केलेल्या लेखी तक्रारीत केला आहे. तसे न केल्यास तुम्हाला अनेक प्रकरणांत अडकविले जाईल. जर तुम्ही तक्रार मागे घेतली तर या प्रकरणात मी तुम्हाला सर्वोतोपरी मदत करेन. वरिष्ठ म्हणून माझा सल्ला ऐका, अन्यथा तुम्ही खूप अडचणीत याल, असा सल्ला पांडे यांनी मला दिला होता, असे सिंग यांनी म्हटले आहे. सिंग यांनी आपल्या आरोपाच्या समर्थनार्थ पांडे यांच्याबरोबर झालेल्या संवादाच्या ऑडिओ क्लिप सीबीआयकडे सादर केल्या आहेत.

परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी हप्ता वसुलीचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. या आरोपाच्या आधारेच सध्या सीबीआय चौकशी सुरु आहे. एकटा व्यक्ती सगळ्या यंत्रणांच्या विरोधात लढू शकत नाही. जर कुणी लढलेच तर तो यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे तक्रार मागे घ्या, असे पांडे मला म्हणाले. त्यावर माझ्या वकिलाशी सल्लामसलत केल्याशिवाय मी काहीच निर्णय घेऊ शकत नाही, असे मी त्यांना सांगितल्याचे सिंग यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान ठाण्यात आयुक्त असताना सिंग यांनी मोक्काच्या गुन्ह्यात अडकवून 3 कोटी 45 लाख उकळल्याचा आरोप क्रिकेट बुकी सोनू जालान याने केला आहे. परमबीर सिंगांची चौकशी करून मला न्याय द्यावा, अशी मागणी त्याने मुख्यमंत्री, गृहमंत्री व पोलीस महासंचालकांकडे केली आहे. तसेच केतन तन्ना या व्यापाऱ्याने सिंग यांनी आपल्याकडून 1 कोटी 25 लाखांची खंडणी वसूल केल्याचा आरोप केला आहे. जालान याने सिंग यांच्याबरोबर ठाणे खंडणी विरोधी पथकातील तत्कालीन अधिकारी प्रदीप शर्मा आणि राजेंद्र कोथमिरे यांच्यावरही आरोप केले आहेत.