Beed News : कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून धनंजय मुंडे झाले भावनाविवश, म्हणाले…

बीड : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची बलात्काराच्या आरोपातून मुक्तता झाल्यानंतर मुंडे प्रजासत्ताक दिनानिमित्त बीडच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्ते अन् चाहत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. कार्यकर्त्यांचे हे प्रेम पाहून मुंडे चांगलेच भावनाविवश झाले होते. अंगावरील कातड्याचे जोडे करुन आपल्याला दिले तरी आपल्या उपकाराची परतफेड करता येणार नाही, अशा शब्दात मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.

मुंडे म्हणाले, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद म्हणजे एखाद्या भगवंताचा प्रसादच आहे. अशा कठीण काळात आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे राहिलात. त्याबद्दल मी शब्दात आभार व्यक्त करु शकत नाही. आजपर्यंत अनेक संकटाला सामोरे गेलो. सामान्य माणसाच्या मनात स्थान निर्माण करुन आज इथपर्यंत पोहोचलो असल्याचेही मुंडे यावेळी म्हणाले. दरम्यान यावेळी मुंडे यांनी यावेळई नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत जिल्ह्याच्या विकासकामात कधीही कमी पडणार नाही, अशी ग्वाही दिली.

जेसीबीतून फुलांची उधळण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आले. शिरुर कासार इथं जेव्हा धनंजय मुंडे दाखल झाले त्यावेळी जेसीबी मशीनमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी झाली. त्याचबरोबर एक भला मोठा हार क्रेनच्या माध्यमातून त्यांना घालण्यात आला. कार्यकर्त्यांकडून झालेल्या या अभूतपूर्व स्वागतामुळे धनंजय मुंडे भारावल्याचे दिसून आले.