धनंजय मुंडेंकडून हॅकिंग प्रकरणाचं राजकारण : प्रकाश महाजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करण्यात आल्याची माहिती असल्यानंच भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा दावा सय्यद शुजा या सायबर तज्ज्ञानं केला आहे. या प्रकरणाची चौकशी रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून केली जावी, अशी मागणी गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि विधानपरिषदेचे  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. मात्र धनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं केवळ राजकारण करू पाहतायेत असे गोपीनाथ मुंडे यांचे मेव्हणे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.
गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू हा अपघात होता की घातपात, याची चौकशी व्हायला हवी या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. ‘गोपीनाथराव मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा एका सायबर तज्ज्ञानं केला आहे. या दाव्याची रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी झाली पाहिजे. कारण ही माहिती एका लोकनेत्याशी संबंधित आहे,’ असं मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हॅकर म्हणजे चोर, त्याच्यावर का विश्वास ठेवायचा ? –
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करण्यात आल्याची माहिती असल्यामुळे केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा गौप्यस्फोट अमेरिकेतील हॅकर सय्यद शुजाने केल्याच्या वृत्तावर प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हॅकर हा शेवटी चोरच असतो, त्यामुळे त्याच्यावर विश्वास नाही, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले असून गेली साडेचार वर्षे हा हॅकर कुठे होता, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

गोपीनाथ मुंडे यांचा हॅकिंगसारख्या गोष्टींवर विश्वास नव्हता; इव्हीएम नव्हते तेव्हाही मुंडे मताधिक्याचा आकडा सांगायचे आणि लिहून ठेवा असेही सांगायचे, त्यांचा तेवढा अभ्यास होता, असे गोपीनाथ मुंडे यांचे मेव्हणे प्रकाश महाजन यांनी सांगत अमेरिकन हॅकरचा दावा खोडून काढला.

निवडणूक आल्यावर गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे यावर विश्वास ठेवण्यासारखा नाही, असेही महाजन यांनी सांगितले.