धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण, केलं ‘हे’ खास आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच अनेक मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे 11 दिवसांपूर्वी म्हणजे 12 मार्चला त्यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला होता.

धनंजय मुंडे यांनी ट्विटर अकाउंटवरुन माहिती देताना राज्यातील जनतेला आवाहन केले आहे. धनंजय मुंडे म्हणाले, माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

दरम्यान, यापूर्वीही धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. जून 2020 मध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.