धुळे महापालिका | अनिल गोटे यांची पत्नी हेमा गोटे विजयी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या उमेदवाराला चारी मुंड्या चित करत अनिल गोटे यांची पत्नी हेमा गोटे विजयी झाल्या आहेत. लोकसंग्रामच्या उमेदवारांपैकी एकमेव हेमा गोटे यांनी विजय मिळवल्याचे समोर आले आहे. अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला अपेक्षित यश मिळालं नसलं, तरी त्यांच्या पत्नी मात्र विजयी झाल्या आहेत. अनिल गोटे यांचे विरोधक असलेल्या मनोज मोरे यांच्या पत्नी भारती मोरे भाजपतर्फे त्यांच्याविरोधात मैदानात होत्या.

हेमा गोटे धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 ब मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अनिल गोटे यांनी पत्नी हेमा गोटे यांना लोकसंग्राम पक्षाकडून धुळ्याच्या महापौरपदाची उमेदवारी घोषित केली होती. मात्र लोकसंग्राम जिल्ह्यात फारशी चमक दाखवू शकला नाही.

भाजपने ईव्हीएममध्ये घोटाळे करुन विजय मिळवल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. भाजप गुंडांचा पक्ष असून बाहेरुन आणलेल्या गुंडांना पक्षात प्रवेश दिला जात असल्याचा घणाघातही त्यांनी केला. धुळ्यातील भाजपच्या विजयानंतर मंत्री गिरीश महाजन आणि अनिल गोटे यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे समोर आले.

जेव्हा मतदानाच्या दिवशीच अनिल गोटे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली होती. यावर भाष्य करताना विरोधकांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप यावेळी अनिल गोटेंनी केला होता. मात्र अनिल गोटे यांच्या आरोपावर वक्तव्य करताना गोटेंना स्टंटबाजीची जुनी खोड असे वक्तव्य करत  भाजप खासदार सुभाष भामरे यांनी गोटेंवर प्रतिहल्ला केला होता.

नाराज अनिल गोटेंनी गेल्या महिन्यात राजीनामा देण्याची घोषणा केली होती. यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी चर्चा करुन त्यांना पक्षात थांबवू ठेवण्यात आलं होतं. परंतु त्यानंतरदेखील पक्षाने आपली फसवणू केली असा दावा करत गोटे यांनी राजीनामा दिला आणि अखेर त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली.