… म्हणून विद्यार्थ्यांने गळफास घेऊन केली आत्महत्या, धुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – उच्च शिक्षणासाठी डोनेशन देणे शक्य न झाल्याने एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बोरकुंड (ता. जि. धुळे ) येथे रविवारी (दि.23) ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे. यामुळेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना डोनेशन देणे आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची प्रतिक्रीया मराठा क्रांती मोर्चा व मयताच्या नातेवाईकांनी केली आहे. भावेश दिलीप चव्हाण (वय 22 रा. बोरकुंड. ता. धुळे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, मयत भावेशने धुळ्यातील एसएसव्हीपीएस महाविद्यालयातून बीएससी उत्तीर्ण केले होते. त्यानंतर तो पुढील प्रवेशासाठी जिल्ह्यातील एका महाविद्यालयात प्रयत्न सुरु केले होते. पण गेल्या काही दिवसांपासून तो प्रवेश मिळत नसल्याने तणावात होता. त्यातच त्याने काल सायंकाळी घरातून बाहेर पडला. पण रात्री उशीरापर्यंत तो परत न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोध सुरु केला. पण रात्री तो आढळला नाही. दरम्यान आज सकाळी दोंडवाड शिवारातील एका शेतातील झाडाला त्याने गळफास घेतल्याची बाब शेतमजुराच्या लक्षात आली. त्यानंतर त्याने ही माहिती गावात दिल्याने चव्हाण परीवारातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याच दरम्यान तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांचे पथक देखिल घटनास्थळी दाखल झाले. यासंदर्भात तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.