‘मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही’ : दीपक केसरकर

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – आता माझी मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता नाही आणि मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही. मला मिळालेल्या संधीचा फायदा व दिशा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दाखवली आहे. मी नगराध्यक्ष नसलो तरी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असून, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देईन, त्याच्या पाठीशी शहरातील नागरिकांनी उभे राहणे गरजेचे आहे, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. दीपक केसरकर पत्रकार परिषदेत बोलत होते.

दीपक केसरकर यांनी सांगितले की, सावंतवाडी शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन मंडळ आणि शासनाकडून मोठा निधी दिला. त्यातून झालेल्या कामांची उद्घाटनं नुकतीच झाली आहेत. पालिकेला जिल्हा नियोजनामधून निधी दिला त्याचे श्रेय दुसरे लोक घेत आहेत. परंतु सावंतवाडी जनतेला माहिती आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

राजकारण आणि थट्टामस्करी थांबवली पाहिजे

चांदा ते बांदा योजनेमुळे भाताचे उत्पादन वाढले असून, चांगले नियोजन केल्यानंतर याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकणाच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. या संधीचा फायदा घेऊन पुढील काळात सिंधुदुर्गासाठी प्रयत्नशील राहणार आहे. कोरोनामुळे राज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता कोरोना संकटाला सामोरे जाताना राजकारण आणि थट्टामस्करी थांबवली पाहिजे, असे केसरकर यांनी म्हटले आहे.

एमआयडीसीत प्रकल्प सुरू करण्यावर भर

केसरकरांनी सांगितले की, संत गाडगेबाबा मंडईसाठी पाच कोटींचा निधीचा खर्च झाला नसल्याने तो निधी परत गेला. जिल्हा नियोजन मंडळ आणि शासनाकडून साडेसात कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. आडाळी एमआयडीसीमध्ये प्रकल्प आणणे, वाफोली येथील प्रकल्प सुरू करणे आणि सावंतवाडी येथील सेटबॉक्स निर्माण करणारे प्रकल्प सुरू करण्यावर आपला भर असणार असल्याचे त्यांनी सांगितले.