बाजार समितीचे ‘ते’ संचालक भाजपच्या वाटेवर ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ असलेल्या सुजित झावरे यांच्या प्रयत्नातून पारनेर बाजार समिती संचालकपदाचा राजीनामा दिलेले 9 संचालक भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. झावरे यांनी नुकतीच गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेतल्याचा फोटो आज सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे हेही उपस्थित आहेत.

नगर जिल्ह्यातील पारनेर बाजार समितीचे राजकारण आता वेगळ्या दिशेला चालले आहे. तीन दिवसांपूर्वी पारनेर बाजार समितीच्या नऊ संचालकांनी राष्ट्रवादीचे नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. मात्र हे राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे द्यायचे की जिल्हा उपनिबंधककडे द्यायचे, याबाबत अजून निर्णय झालेला नाही. त्यामध्येच आज राष्ट्रवादीचे नेते सुजित झावरे यांनी राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांचे स्वागत करून सत्कार केल्याचे फोटो व्हायरल झाले. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बाजार समितीत भाजपचा सभापती?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारनेर बाजार समितीमध्ये सत्तांतर घडवून पारनेर बाजार समितीचा भाजपचा पहिला सभापती बनवण्याचा चंग राधाकृष्ण विखे पाटील यांनी बांधला असल्याचे समजते. आजपर्यंतच्या इतिहासात पारनेर बाजार समितीवर भाजपचा एकही सभापती झालेला नाही. तो इतिहास पुसून भाजपचा पहिला सभापती बनविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने विखे यांच्याकडून राजकीय व्यूहरचना सुरू करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –