लोकसभा निकालापुर्वी मुलायमसिंह-अखिलेश यादव यांना CBIची ‘क्लीन चिट’ ; काॅंग्रेससह इतर पक्षांच्या ‘भुवया’ उचांवल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांना दिलासा मिळाला आहे. यादव पिता-पुत्राविरोधात ठोस पुरावा मिळालेला नाही असे म्हणत सीबीआयने त्यांना क्लीनचिट दिली आहे. याविषयी सीबीआयने मंगळवारी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले.

सीबीआयने प्रतिज्ञा पत्रात म्हंटले आहे की, ‘आम्ही या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली आहे आणि चौकशीत मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्या विरोधात ठोस पुरावे समोर आले नाही. त्यामुळे या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही. ‘

काय आहे प्रकरण –
सत्तेचा गैरवापर करून अधिक संपत्ती गोळा केल्याबद्दल भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये मुलायमसिंह यादव, अखिलेश, प्रतीक आणि डिम्पल यादव यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्याचे आदेश सीबीआयला द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे नेते विश्वनाथ चतुर्वेदी यांनी २००७ मध्ये एका जनहित याचिकेद्वारे सुुप्रीम कोर्टात केली होती. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश कोर्टाने २००७ मध्ये दिले होते. २००८ मध्ये सीबीआयने खटला दाखल करण्यासाठी त्यांच्याकडे सबळ पुरावे असल्याचे म्हटले होते. तर ७ ऑगस्ट २०१३ रोजी या प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आली. मार्च महिन्यात झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मुलायमसिंह यादव आणि त्यांच्या पुत्रांविरुद्धच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा तपास सध्या कोणत्या टप्प्यावर आहे. त्याबाबत म्हणणे मांडावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने सीबीआयला दिले होते.