शिवप्रतिष्ठानमधील वाद चव्हाटयावर, संभाजी भिडेंकडून कार्यवाह नितीन चौगुलेंचं निलंबन

सांगली : पोलिसनामा ऑनलाईन – प्रखर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या शिवप्रतिष्ठान संघटनेच्या कार्यवाह पदावरून नितीन चौगुले यांना संस्थापक संभाजी भिडे यांनी निलंबित केल्यामुळे संघटनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. चौगुले हे संभाजी भिडे यांचे निकटवर्तीय म्हणूनही परिचित होते. चौगुले यांच्याबद्दल दोन वर्षांपासून तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्यांना संघटनेतून निलंबित केले आहे, असे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी सांगितले.

राज्यातील मोठी हिंदुत्ववादी संघटना म्हणून शिवप्रतिष्ठान संघटना ओळखली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून चौगुले संघटनेच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये अग्रभागी होते. या संघटनेत काही महिन्यांपासून वाद धुमसत होता. दरम्यान, चौगुले यांच्याबद्दल दोन वर्षांपासून अंतर्गत तक्रारी सुरू झाल्या होत्या. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार त्यांचे संघटनेतून निलंबित करण्यात आले. चौगुले यांच्याबद्दल नेमकी काय तक्रार होती, याचा संघटनेने फारसा खुलासा केलेला नाही.
निलंबन कारवाई झाल्यानंतर चौगुले आणि त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत शुक्रवारी गावभागात कारवाई मागे घ्यावी म्हणून चौगुले समर्थकांनी भिडे यांना विनंती केली होती. मात्र, भिडे यांनी कारवाईवर ठाम राहण्याची भूमिका घेतली.