पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून BARC मधील 37 वर्षाच्या वैज्ञानिकाची आत्महत्या

मुंबई :  पोलिसनामा ऑनलाईन – मुलांना खाण्यासाठी देण्याच्या कारणावरून पत्नीसोबत झालेल्या भांडणातून बीएआरसीमधील ३७ वर्षीय वैज्ञानिक अधिकाऱ्याने पंख्याला टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. अनुज त्रिपाठी असे या अधिकाऱयाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अणुशक्तीनगर येथील आकाशरत्न इमारतीत त्रिपाठी कुटुंबासह राहत हाेते. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुलांना खाण्यासाठी देण्याच्या कारणावरून पत्नी सरोजशी त्यांचे भांडण झाले. याच भांडणाच्या रागातून त्यांनी बेडरूममधील पंख्याला टॉवेलने गळफास घेतला.

बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने पत्नीने दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. तेव्हा ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळेले. त्यांना तत्काळ बीएआरसीच्या रुग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले.