पिंपरी : TV चा आवाज कमी करण्यास सांगितल्याने झाला वाद ! विनयभंगाचे 2 गुन्हे दाखल, चौघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने झालेल्या वादात 2 महिलांचा विनयभंग झाला. पिंपळे गुरव येथे मंगळवारी (दि.23) ही घटना घडली या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून चौघांना अटक केली आहे.

पहिल्या प्रकरणात 22 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका आरोपीला अटक केली आहे. दुसऱ्या प्रकरणात 27 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार 3 आरोपींना अटक केली आहे.

वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात फिर्यादींच्या शेजारी राहणारी महिला फिर्यादीच्या घरात आली. तुम्ही टीव्हीचा आवाज बंद करा, असे त्या महिलेने फिर्यादीला सांगितले. माझा मुलगा रडायचा बंद झाला की टीव्हीचा आवाज बंद करते, असे फिर्यादीने सांगितले. त्यानंतर संबंधित महिलेचा पती दारूच्या नशेत तेथे येऊन गैरवर्तन करत फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. तर दुसर-या प्रकरणात 27 वर्षीय फिर्यादी महिला घरी असताना त्यांना आराम करायचा होता म्हणून टीव्हीचा आवाज कमी कर असे त्यांनी आरोपीच्या घरी जाऊन सांगितले. मात्र टीव्हीचा आवाज कमी न करता मोठा केला. त्यानंतर आरोपी हे फिर्यादीच्या घराबाहेर आले आणि फिर्यादीला मारहाण करून गैरवर्तन करून फिर्यादीच्या मनास लज्जा निर्माण केली.