सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांचे पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुक्रवारी वितरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्काराचे वितरण १५ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे.

गेल्या दोन वर्षाचे पुरस्कार या कार्यक्रमात दिले जाणार आहे. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणूकां मुळे या पुरस्कारांचे वितरण झाले नव्हते. त्यामुळे २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षांचे पुरस्कार यावेळी वितरित केले जाणार आहेत. ता. १५फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता नानापेठेतील अहिल्याश्रम येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल अशी माहिती सामाजिक व न्यायमंत्री न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक आदी उपस्थित राहणार आहेत. राज्यातील मातंग समाजाच्या विकासाठी योगदान देणाऱ्या मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक, समाजसेवक यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देण्यात येतो. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि पंचवीस हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप पन्नास हजार रुपये, शाल, श्रीफळ असे आहे. पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार संस्था आणि व्यक्ती दिला जातो.

प्रत्येकी ५१ हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अण्णाभाऊ साठे पुरस्कार ५० जणांना आणि बारा संस्थांना दिला जाणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पुणे विभागात उभारण्यात आलेल्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन लोकार्पण, आदी कार्यक्रमही १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे अशी माहिती कांबळे यांनी दिली. मुंबई येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी घाटकोपर येथील चिराग नगरी येथील सात हेक्टर जागेची निवड केली. चिराग नगर येथे लोकशाहीर राहत होते त्याच ठिकाणी हे स्मारक केले जाणार आहे. या ठिकाणी असलेल्या रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन केले जाणार आहे असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचेही त्यांनी नमूद केले.