असा फरार झाला होता कुख्यात ‘डॉ. बॉम्ब’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ज्याची ओळख कुख्यात डॉ. बॉम्ब म्हणून आहे त्या डॉ. जलीस अन्सारीला शुक्रवारी कानपूरमध्ये अटक करण्यात आली. अन्सारीची जेव्हा पॅरोलवर सुटका झाली तेव्हा तो फरार झाला होता. परंतु पुन्हा त्याला अटक करण्यात आली असून आता त्याची चौकशी चालू आहे.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान अन्सारीनं फरार होण्यामागील कारण सांगितले तर पोलीस आश्चर्यचकित झाले. तब्बल २६ वर्षानंतर अन्सारीची पॅरोलवर सुटका झाल्याने तो घरी गेला. परंतु त्याची मुलं आणि पत्नीसोबत भांडण होत होती. त्यामुळे त्यानं भांडणाला वैतागून घर सोडले. घराबाहेर पडताच त्यानं टॅक्सी पकडली आणि भायखळा स्थानक गाठलं. भायखळावरून कल्याण आणि नंतर सकाळी ९.३०च्या आसपास त्यानं पुष्पक एक्स्प्रेसनं कानपूर गाठलं. त्यानंतर त्यानं कानपूरमधील फेथफुलगंज मध्ये एका उंच मशिदीत आसरा घेतला होता. एका स्थानिकाच्या मदतीने त्यानं कानपूर स्थानक गाठलं आणि या वेळी अन्सारीसोबत एक पाच वर्षाचा मुलगा देखील होता. त्या मुलाचे बोट पकडून अन्सारी स्थानकाच्या दिशेने चालू लागला आणि विशेष म्हणजे त्या मुलाबरोबर त्याचे वडील देखील होते. कानपुर स्थानक आल्यानंतर त्या लहान मुलाला त्यानं सोडलं. त्यानंतर तो लखनौ ला जाण्यासाठी ट्रेनची चौकशी करत होता आणि त्या दरम्यानच पोलिसांनी त्याला अटक केली.

दरम्यान अन्सारी मुंबईतून फरार झाल्यानंतर लगेचच उत्तर प्रदेश पोलिसांना सतर्क करण्यात आलं होतं. अन्सारी हा मूळचा मुंबईचा राहणारा असून त्याला राजस्थानमधील अजमेर सेंट्रल जेलने २१ दिवसांच्या पॅरोलवर सोडलं होतं. अन्सारी शुक्रवारी सरेंडर करणार होता. एका अधिकाऱ्याने सांगितलं की पॅरोलदरम्यान अन्सारी रोज सकाळी १०.३० ते १२ च्या दरम्यान मुंबईच्या आग्रीपाडा येथील पोलीस ठाण्यात येऊन हजेरी लावत होता. मात्र गुरुवारी तो आला नसल्याने पोलीस सतर्क झाली. दरम्यान दुपारच्या सुमारास अन्सारीचा ३५ वर्षीय मुलगा जेद हा पोलीस ठाण्यात आला आणि त्याचे वडील बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. घरी नमाज अदा करायला जातो असं सांगून अन्सारी गायब तो पुन्हा आलाच नव्हता. त्यानंतर तातडीनं पुढील सूत्र हलवण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/