‘या’ डॉक्टरनं सीरियाला जाऊन ISIS दहशतवाद्यांचा केला उपचार, NIA नं अब्दुल रहमानला केलं अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  राष्ट्रीय तपास यंत्रणेने इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत (आयएसकेपी) प्रकरणात बंगळुरु येथून एका आरोपीला अटक केली आहे. त्याचे नाव अब्दुल रहमान असल्याचे आणि व्यवसायाने तो नेत्ररोग तज्ञ असल्याचे सांगितले जात आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, या डॉक्टरने सीरिया येथे जाऊन इसिसच्या दहशतवाद्यांचा उपचारही केला आहे. २८ वर्षीय अब्दुल रहमान बंगळुरूच्या रमैया मेडिकल कॉलेजमध्ये नेत्ररोग तज्ञ म्हणून काम करत होता.

आयएसकेपीशी संबंधित हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मार्च २०२० मध्ये काश्मिरी दाम्पत्याच्या अटकेनंतर नोंदवले होते. दिल्लीच्या जामिया नगरमधील ओखला विहार येथून जहानजीब सामी वानी आणि त्यांची पत्नी हिना बशीर बेघ यांना पोलिसांनी अटक केली होती. ते आयएसकेपीशी संबंधित असल्याचे आढळले होते. ही बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना आहे आणि इसिसचा एक भाग असून ते विध्वंसक आणि देशविरोधी कार्यात सहभागी असल्याचे आढळून आले आहे. हे काश्मिरी दाम्पत्य अब्दुल्ला बसिथच्या संपर्कातही आले होते, जो आधीपासूनच एनआयएच्या आणखी एका प्रकरणात (इसिस अबु दाबी मॉड्यूल) तिहार तुरूंगात कैद होता.

चौकशीदरम्यान अब्दुल रहमानने कबूल केले की, तो आरोपी जहानजीब सामी आणि सीरियातील अन्य इसिसच्या कार्यकर्त्यांसह आयएसआयएसच्या कारवायांसाठी सुरक्षित मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर कट रचत होता. तो संघर्ष भागात जखमी झालेल्या इसिस कार्यकर्त्यांची मदत करण्यासाठी वैद्यकीय प्रक्रिया विकसित करण्याच्या आणि इसिसच्या लढाऊंसाठी एक शस्त्र संबंधित अर्ज करण्याच्या प्रक्रियेत होता.

विशेष म्हणजे की, अब्दुल रहमानने २०१४ च्या सुरुवातीला सीरियामधील इसिसच्या एका मेडिकल शिबिराचा दौरा केला होता आणि १० दिवस इस्लामिक स्टेटच्या कार्यकर्त्यांसह मुक्काम केला होता. त्याला अटक केल्यानंतर एनआयएने कर्नाटक पोलिसांच्या मदतीने बंगळूरमध्ये त्याच्याशी जोडलेल्या ०३ जागांचा शोध घेतला आणि डिजिटल उपकरणे, मोबाइल फोन, लॅपटॉप्ससह आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. अटक केलेल्या आरोपीस नवी दिल्लीतील विशेष एनआयए कोर्टासमोर दाखल केले जाईल आणि त्याच्या कोठडीतील चौकशीसाठी एनआयएचा रिमांड मागितला जाईल.