डॉ. आकांक्षा देशमुख खून प्रकरण : पोलिसांना मारेकरी सापडेना

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – संपूर्ण औरंगाबाद शहराला हादरवून टाकणाऱ्या डॉ. आकांक्षा देशमुख खून प्रकरणात पोलिसांना आरोपीचा शोध घेता आला नाही. कडक सुरक्षा असलेल्या आकांक्षाचा खून झाल्याची घटना ११ डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. पाच दिवस झाले तरी पोलीस मारेकऱ्यांपर्यंत पोहचू शकले नाहीत. या गुन्ह्यात कॅम्पस सोडून गेलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. तर एमजीएम मध्ये अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी तळ ठोकला आहे. पोलिसांकडून कर्मचारी आणि विद्यार्थ्याकडे चौकशी करण्याचे काम सुरु आहे. मात्र, अद्याप कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. खुनाचे धागेदोरे शहराबाहेर पोचल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

गंगा वसतिगृहातील आकांक्षाचा ११ डिसेंबरला खून झाल्याचे उघड झाले. तिचा मारेकरी बाहेरून वसतिगृहात आल्यास एकाच मार्गाने रजिस्टरवर नोंद करून यावे लागते; परंतु ते शक्‍य नाही. त्यामुळे मारेकरी वसतिगृहात मागील बाजूने आला असावा अथवा वसतिगृहातीलच असावा असाही कयास बांधला जात आहे. त्यामुळे वसतिगृहातीलच कुणीतरी किंवा बाजूला काम करणाऱ्यांचा यात सहभाग आहे का, हे पडताळले जात आहे. त्यामुळेच पोलिस दलातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठांपर्यंत सर्वांनीच एमजीएममध्ये ठाण मांडले आहे. ते घटनास्थळी वारंवार भेट देत असून, अभ्यास करीत आहेत. पोलिसांनी वसतिगृह व कॅम्पस्‌वरच लक्ष केंद्रित केले आहे.

सूत्रांनुसार रविवारपर्यंत २५ कामगारांची चौकशी झाली. काहींची चौकशी बाकी आहेत. ती लवकरच होईल. मोजक्‍याच विद्यार्थिनींचे जबाब घेतले असले, तरीही अद्याप महत्त्वपूर्ण जबाब बाकी आहेत. कामगारांच्या चौकशीनंतर उर्वरितांचे जबाब घेऊन चौकशी होणार आहे.

घाटी रुग्णालयाच्या न्यायसहायक वैद्यक विभागाचे पथक, फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी; तसेच पोलिस दलातील उच्चपदस्थांचा आकांक्षा खून प्रकरणात विचारविमर्श झाला. पोलिस आयुक्तही घटनास्थळी गेले व त्यांनी तांत्रिक व वैज्ञानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दोन बाजूंनी तपास ट्रॅकवरच असून, गतीही मिळत आहे.

आकांक्षाचे आई-वडील सोमवारी (ता. १७) पोलिसांना भेटणार आहेत. याची तपासात मोठी मदत मिळेल. आकांक्षाच्या आई-वडिलांची विचारपूस करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले. उपनिरीक्षक ठुबे यांच्याकडे असलेला तपास वर्ग करून तो पोलिस निरीक्षक परदेशी यांच्याकडे देण्यात आला आहे.

‘‘बहीण समोर बेशुद्धावस्थेत दिसली. तिच्यापुढे मी डॉक्‍टर आहे, हे विसरलो. कारण तिला तत्काळ रुग्णालयात नेणे हीच माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब होती. ऐनवेळी काय करावं हेच लक्षात आलं नाही,’’ असे डॉक्‍टर असलेले आकांक्षाचे भाऊ राहुल देशमुख यांनी सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.