नक्षलवाद्यांच्या हाती आले ‘ड्रोन’, सुरक्षा दलाला तळांच्या सुरक्षेचे ‘आव्हान’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – चीन व अन्य देशाकडून नक्षलवाद्यांना मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक शस्त्रे पुरविली जातात. पण आता या नक्षलवाद्यांकडे ड्रोन सारखे मोठे हत्यार लागले असून त्यामुळे नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा दलांच्या तळांच्या सुरक्षेचे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांना हे ड्रोन मुंबईतील एका दुकानदाराने विकल्याचे समोर आले आहे. विवाह समारंभ, सार्वजनिक सभा यांच्या चित्रिकरणासाठी छोटे ड्रोन वापरले जातात.

असेच ड्रोन नक्षलवाद्यांच्या हाती लागल्याचे दिसून येत आहे. छत्तीसगडच्या बस्तर विभागातील सर्वाधिक नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुकमा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर ड्रोनने घिरट्या घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सुरक्षा दल व गुप्तचर संस्थांनी गांभीर्याने घेतला असून यापुढे असे ड्रोन किंवा मानवरहित हवाई यान (यूएव्ही) दिसताच पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लाल व पांढरा रंग उत्सर्जित करणारे ड्रोन मागील महिन्यात दिसले होते. किस्ताराम व पालोडीमधील सीआरपीएफ तळांच्या वर तीन दिवसांत किमान चार वेळा हे ड्रोन घिरट्या घालताना दिसले होते. ड्रोनच्या आवाजाने तळातील जवानांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर तेथे तैनात असलेल्या जवानांनी त्या परिसरातील तळांना सतर्क केले होते. या ड्रोनवर निशाणा साधून ते पाडण्यात येईपर्यंत ते आकाशात गायब झाले होते.

ही घटना समोर येताच सुरक्षा दलांनी या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. मुंबईतील एका दुकानदाराने हे ड्रोन अज्ञात लोकांना विकल्याची माहिती गुप्तचरांच्या हाती लागली आहे. माओवाद्यांनी ड्रोन बाळगणे व त्याचा वापर करणे, हे आता सुरक्षा दलांसमोर नवे आव्हान असणार आहे. सुरक्षा दलांना मागील बऱ्यांच काळापासून याबाबत शंका होती. ती आता खरी ठरली आहे. मात्र, असे ड्रोन किंवा मानवरहित यान दिसताच पाडण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. सीआरपीएफच्या तळांवर घिरट्या घालताना दिसलेल्या ड्रोनच्या वर्णनावरून त्याचे विश्लेषण करणे सुरू आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like