डीएसके यांच्या मालमत्ता जप्तीची अधीसुचना जारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन
ठेवीदारांची फसवणूक केल्याने सध्या कारागृहाची हवा खात असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी़एस़ कुलकर्णी यांच्या मालमत्ता जप्तीच्या आदेशाची अधिसूचना शासनाने जारी केली आहे़ त्यामुळे आता ठेवीदारांना त्यांच्या ठेवीचे पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरु झाली आहे़.

या अधिसूचनेत १२४ विविध ठिकाणी असलेल्या जागा, विविध कंपनीच्या नावावरील तसेच वैयक्तिक अशी एकूण २७६ बँक खाती आणि महागड्या आलिशान गाड्यांसह ४६ दुचाकी व चार चाकी वाहने जप्त करण्यात आली आहे़. डीएसके यांच्या पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष तसेच कंपन्यांच्या नावावर या जागा, बँक खाती आणि वाहने आहेत़.

डीएसके यांच्याविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर, कोल्हापूर आणि मुंबई येथील पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे) संरक्षण अधिनियम १९९९ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत़ ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी त्यांच्या मालमत्ता जप्त करुन त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे़ त्यासाठी त्यांच्या मालमत्तांची यादी पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेने करुन पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आली होती़ तत्कालिन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी याची जबाबदारी मावळचे प्रांत अधिकारी सुभाष भागडे यांची नियुक्ती केली आहे़ त्यांनी मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव तयार करुन सुमारे ३ महिन्यांपूर्वी शासनाकडे पाठविले होते़ प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता ही अधिसूचना जाहीर झाली आहे़ . त्यामुळे आता शासनाला या मालमत्तांचा लिलाव करण्याचा मार्ग मोकळा झाला असून ठेवीदारांचे पैसे परत करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे़.