साई दर्शनाचे दरवाजे भक्तांसाठी पुन्हा बंद, 5 ते 30 एप्रिल मंदिर राहणार बंद

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या ब्रेक दि चेन या धोरणांतर्गत सोमवार (दि. 5) पासून 30 एप्रिलपर्यंत शिर्डीतील साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली. तसेच साईसंस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय व कॅन्टीनसुद्धा बाहेरून येणा-या भाविकांसाठी बंद राहणार आहे. प्रसादालयात केवळ रूग्णालय व कोरोना सेंटरच्या रूग्णांसाठीच जेवण बनवले जाणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

साईसंस्थानच्या इतिसाहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिस-यांदा मंदीर दर्शनासाठी बंद ठेवले जात आहे. 1941 मध्ये कॉलराचा संसर्ग रोखण्यासाठी मंदीर ऐन रामनवमीत बंद ठेवले होते. यानंतर कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने 17 मार्च 2020 पासून 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत मंदीर बंद होते. 16 नोव्हेंबरला मंदीर पुन्हा सुरू झाल्यानंतरही 23 फेब्रुवारी 2021 पासून दर्शनाच्या वेळा सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत कमी केल्या. त्यामुळे पहाटेची व रात्रीची आरती भक्ताविना होवू लागली. त्यानंतरही कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेवून 28 मार्च 2021 पासून वेळेत आणखी कपात करून दर्शनाची वेळ सकाळी सव्वा सात ते रात्री पावणे आठ केली होती. त्यानंतर आज सोमवारी रात्री आठ वाजेपासून शासनाच्या ब्रेक दि चेन धोरणानूसार पुन्हा मंदीर बंद ठेवले जाणार आहे.