पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळे विद्यार्थ्याला हरवलेली बॅग मिळाली परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची बॅग रिक्षात विसरली. त्याने रिक्षाचा शोध घेतला मात्र रिक्षा सापडली नसल्याने त्याने खडक पोलीस ठाण्यात जाऊन बॅग हरवल्याची तक्रार दिली. खडक पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षाचा शोध घेऊन विद्यार्थ्याची हरवलेली बॅग परत केली. पुणे पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळे एका विद्यार्थ्याला त्याची हरवलेली बॅग सुखरुप परत मिळाली.

पुण्यातील एका महाविद्यालयात शिकणारा डॉरविन जॉन हा काही कामानिमित्त शुक्रवार पेठेत आला होता. त्याला हडपसर येथील गाडीतळ येथे जायचे असल्याने त्याने रिक्षा थांबवली. रिक्षा चालकाने अधीकचे भाडे सांगितल्याने तो रिक्षातून खाली उतरला. पण त्याची बॅग रिक्षातच विसरली. बॅगेमध्ये त्याचा मोबाईल, महाविद्यालयाचे ओळखपत्र आणि महत्वाची कागदपत्र होती. त्याने मित्राच्या मदतीने रिक्षाचा शोध घेतला मात्र रिक्षा सापडली नाही. त्याने खडक पोलीस ठाण्यात जाऊन याची तक्रार दाखली केली.

खडक पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अशिष चव्हाण व महावीर दावणे यांनी विद्यार्थी ज्या ठिकाणी रिक्षात बसला होता त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी MH12 QE 1620 या रिक्षाचा नंबर त्यांना मिळाला. रिक्षाच्या नंबर वरुन पोलिसांनी रिक्षा मालकाचे नाव शोधून काढले. पोलिसांनी रिक्षा मालक जगन्नथ गेंजगे यांना संपर्क साधून त्यांच्याकडे चौकशी केली असता गेंजगे यांनी रिक्षामध्ये बॅग असल्याचे सांगितले. पोलिसांनी बॅग ताब्यात घेऊन विद्यार्थ्याच्या स्वाधीन केली. हरवलेली बॅग परत मिळाल्याने विध्यार्थ्याने खडक पोलिसांचे अभार मानले.