मनसैनिकाने प्यायले फिनेल, राज ठाकरेंच्या नावाने चिठ्ठी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – बदनामी करत पक्षातून काढल्याच्या कारणावरून मनसेच्या शहर सहसचिवाने फरशी पुसण्याचे फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उस्मानपुरा भागात घडली. अभय मांजरमकर असे या पदाधिकाऱ्याचे नाव असून, त्याला वेळीच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मांजरमकरकडे राज ठाकरे यांच्या नावाने लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, त्यात आपले म्हणणे मांडू दिले नसल्याने आत्महत्या करत असल्याचे नमूद आहे. या घटनेने पक्षात खळबळ उडाली असून, अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

अभय मांजरमकर यांनी मनसेचे जिल्हा संघटक बिपिन नाईक यांच्या उस्मानपुरा कार्यालयाजवळ फिनेल पिले. ही माहिती उपाध्यक्ष गौतम अमराव यांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. इतर पदाधिकाऱ्यांच्या मदतीने मांजरमकर यांना क्रांती चौक भागातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मांजरमकर यांच्याजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या नावाने ही चिठ्ठी असून त्यात कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार आल्यानंतर त्याची सुनावणी घेत आणि त्याची बाजू ऐकून घेतल्यानंतर पदावरून काढण्यात येते. परंतु आपल्याबाबतीत ही पद्धती राबविली गेली नाही. जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर आणि राजू पाटील यांनी एकतर्फी निर्णय घेऊन आपल्याला पदावरून हटविले. नैसर्गिक न्यायाने बाजू मांडू दिली नाही.

या कारवाईची माहिती सोशल मीडियावर टाकून बदनामी केली. अनेक वर्षांपासून पक्षाचे काम केल्यानंतर अशा पद्धतीची वागणूक मिळत असल्याने आत्महत्या करत आहे. त्याला जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर आणि नेते राजू पाटील जबाबदार असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे.

मोबाईलवर खेळत बसल्यामुळे आई रागावली ; १३ वर्षाच्या मुलाने केला आयुष्याचा शेवट