उत्तर भारताला भूकंपाचा धक्का

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर भारत बुधवारी सकाळी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. उत्तर प्रदेशातील बागपत येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सकाळी ७ वाजून ५९ मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४ इतकी असून तो ६ किमी खोलीवर होता.

सकाळी कामाच्या वेळी अचानक भूकंपाचा धक्का जाणवल्याने उत्तर भारतातील अनेक शहरात लोक धावतच रस्त्यावर आले. या भूकंपाचे धक्के दिल्ली, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थान या परिसरात जाणवले. अनेकांनी ट्विटर आणि फेसबुकवरही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे ट्विट आणि पोस्ट केल्या आहेत. दरम्यान, भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली असल्याचे अद्यापपर्यंत वृत्त नाही.