हिंगोलीत लागोपाठ दोनदा भुकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांनी रात्र काढली जागून

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील शनिवारी सायंकाळी बसलेल्या भुकंपाच्या धक्कानंतर मध्यरात्री पुन्हा भुकंपाचा सौम्य धक्का बसला. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील नागरिकांनी भितीने संपूर्ण रात्र जागून काढली. हिंगोली जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ४ वाजून ९ मिनिटांनी भुगर्भात दोन वेळा गुढ आवाज होऊन भुकंपाचे सौम्य धक्के बसले. भुकंपाचा हा धक्का रेक्टर्स स्केलवर ३.४ इतक्या क्षमतेचा नोंदविला गेला. त्याची खोली १० किमी खोल होती. या भुकंपाचे केंद्र यवतमाळ जिल्ह्यात १९.५६ अक्षांश आणि ७७.६७ रेखांशावर होता.

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, शिरळी, राजवाडी आदी गावांतील नागरिकांना भुकंपाचा धक्का जाणवला. मात्र, या भुकंपाच्या धक्काने कोणतेही नुकसान झाले नसल्याचे वसमतचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी सांगितले.
यानंतर मध्यरात्री १२ वाजून ४१ मिनिटांनी हिंगोलीला आणखी एक भुकंपाचा धक्का बसला. या भुकंपाचे केंद्र १९.५३ अक्षांश आणि ७७.१३ रेखांशवर असून तो ५ किमी खोल होता. त्यांचा रेक्टर स्केलवर ३.२ इतकी नोंद झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हा भुकंपाचा धक्का जाणवला. त्यामुळे झोपलेले असंख्य नागरिक खडबडुन जागे झाले. एका पाठोपाठ दोन भुकंपाचे धक्के बसल्याने हिंगोलीतील नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. या भुकंपाची कारणे शोधावीत़ तसेच हिंगोलीतील अनेक तालुक्यात भुकंपमापन यंत्रणा नाही. तालुक्याच्या ठिकाणी भुकंपमापन यंत्रे बसवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.