स्कूल बसला पुन्हा कोरोनाचे ग्रहण; शाळा पुन्हा बंद झाल्याने चालक-मालक ‘हवालदिल’

पुणे : कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढल्याने पुन्हा शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे स्कूल बसचालक-मालक हवालदिल झाले आहेत. कोरोनाचा ज्वर कमी झाल्यानंतर तब्बल अकरा महिन्यानंतर शाळा सुरू झाल्याने स्कूल बसचालक-मालकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. दरम्यान, कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात निवळली होती. त्यामुळे शाळा सुरू झाल्या आणि स्कूल बसही सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तब्बल अकरा महिन्यांपासून करोना संकटाच्या गाळात रूतलेले राज्यातील एक लाखांहून अधिक स्कूल बसचे चाक अद्यापही मोकळे होऊ शकले नाही.

कोरोना विषाणूच्या संकटातून बाहेर येत असताना पहिल्याच टप्प्यात वाहतूक सुरू केली होती. त्यामुळे माल आणि प्रवासी वाहतुकीतील वाहने सुरू झाली असली, तरी शाळा बंदमुळे स्कूल बस सुरू होऊ शकल्या नाहीत. कोरोनाची स्थिती काहीसी निवळल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय त्या-त्या स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यानंतरही स्कूल बसला परवानगी देण्यात आली नव्हती. काही दिवसांत अधिकृतपणे स्कूल बस सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, राज्यात पुन्हा करोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आणि शाळा बंद करण्यात आल्या. त्यामुळे स्कूल बस सुरू होण्याची शक्यता पुन्हा धूसर झाली आहे.

मागिल अकरा महिन्यांपासून कोरोनामुळे स्कूल बस बंद असल्याने स्कूल बसचालक-मालक आणि विद्यार्थ्यांची देखरेख करण्यासाठी नेमलेल्या सहायकांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. अनेक जण भाजीविक्री आणि इतर काहीतरी कामधंदा करून कशीबशी गुजराण करीत आहेत. वाहने बंद असल्याने राज्य शासनाने डिसेंबरपर्यंत करात माफी दिली होती. ही मुदत आता संपली आहे. बँका आणि वित्त संस्थांचे हप्तेही सुरू आहेत. त्याचप्रमाणे विम्याबाबत कोणतीही सवलत मिळालेली नाही. व्यवसाय बंद असताना स्कूलबस चालकाच्या डोक्यावर अप्रत्यक्ष कर्जाचा बोजा वाढतच आहे. अशा स्थितीत केंद्र आणि राज्य शासनानेही स्कूलबसबाबत सकारात्मक भूमिका घेऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्कूल बसचालक-मालक आणि सहाय्यकांकडून केली जात आहे.

वाहने बंद असल्याने वाहनांचेही नुकसान

स्कूल बस म्हणून नोंदणी असलेली गाडी इतर कोणत्याही वाहतुकीसाठी वापरता येत नाही. परिणामी स्कूल बस म्हणून नोंदलेल्या बहुतांश गाड्या मागिल अकरा महिन्यांपासून जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे त्यांची तांत्रिक हानीही होते आहे. गाडीची बॅटरी, इंजिन आदींमध्ये समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. संबंधित गाडी सुरू करायची झाल्यास २५ ते ५० हजारांपर्यंत खर्च करावा लागणार असल्याचे स्कूल बस चालकांकडून सांगण्यात येत आहे.