ED चे देशभरात छापे ! ‘हवाला’व्दारे होणार्‍या सोन्याच्या तस्करीचा ‘पर्दाफाश’, अनेक ज्वेलर्स ‘गोत्यात’ अन् 39 Kg ‘सोनं-चांदी’ जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काही शहरांतील सोन्याच्या तस्करीच्या टोळीशी संबंधित असलेल्या सराफा व्यापाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले असून 3.75 कोटी रुपयांची रोख आणि 39 किलो सोने – चांदी जप्त केली आहे. परदेशी विनिमय व्यवस्थापन अधिनियम (फेमा) च्या तरतुदीनुसार ईडीने जयपूर, कोलकाता आणि चेन्नईमधील विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत सीमाशुल्क, जीएसटी आणि प्राप्तिकरांची मोठी चोरी आढळली असल्याचा दावा एजन्सीने सोमवारी केला.

एजन्सीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “जयपूरचे महाराजा ज्वेलर्स (मालक तारा चंद सोनी), भगवती ज्वेलर्स (मालक: राम गोपाल सोनी) आणि चेन्नईचे लाडीवाला असोसिएट्स (मालक: हनी लाडीवाला) हे चेन्नईचे हर्ष बोथरा आणि बांका बुलियन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून तस्करी केलेल्या सोन्याचे बार खरेदी करत होते.

ईडीने सांगितले कि, सोन्याच्या बारची तस्करी करून जयपूरला नेण्यात बरेच लोक गुंतले होते. सोन्याचे बार मुख्यतः कोलकात्याहून जयपूरला पोहोचत जे अत्यंत शुद्ध दर्जाचे होते. ईडीने म्हटले आहे की संशयित आरोपी सोन्याच्या बारांवर कोरलेल्या परदेशी निर्मात्याचे चिन्ह किंवा बँक चिन्ह काढून ते देशात तस्करी करत असत. यानंतर स्थानिक बाजारात त्यांची विक्री केली जात असत. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, “जयपूर, कोलकाता आणि चेन्नई येथे विविध ठिकाणी छापे टाकून भारतीय व विदेशी चलन किमतीचे 3.75 कोटी रुपये, 26.97 किलो सोन्याचे बार आणि दागिने आणि 12.22 किलो चांदीसोबत गुन्ह्याकडे लक्ष वेधणारे कागदपत्र सापडले आहेत”. तसेच जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक व डिजिटल उपकरणांचा अद्याप तपास केला जात असून यातून अवैध व्यवहाराची पुढील माहिती मिळण्याची शक्यता ईडीने व्यक्त केली आहे.