मल्या, मोदी आणि चोक्सी यांच्या परदेशातील संपत्तीवरही येणार टाच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आर्थिक घोटाळेबाज विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी या तिघांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आता मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ईडीने या आरोपींची १५ हजार कोटींची संपत्ती जप्त करण्याची तयारी सुरु केली आहे. यातील पाहिली कारवाई लंडनला पळालेल्या मद्य व्यापारी विजय मल्यावर होणार आहे. त्यानंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी, जतिन मेहता यांच्यावरही संपत्ती जप्तीची कारवाई होणार आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकांचे कर्ज बुडवणारे तसेच विविध आर्थिक घोटाळ्याप्रकरणी खटले सुरु असणाऱ्या न्यायालयांशी संपर्क साधत या सर्वांच्या विरोधात नव्या अध्यादेशानुसार ईडीला कारवाईचे अधिकार दिले आहेत.

या अधिकारांचा वापर करून फरार आरोपींच्या देश-विदेशातील संपत्तीवर तत्काळ जप्ती येणार आहे. आजवर ईडीच्यावतीने प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत जप्तीची कारवाई केली जाऊ शकत नव्हती. या कायद्यानुसार, संपूर्ण सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच ईडीला संपत्ती जप्तीची कारवाई करता येत होती. या प्रक्रियेलाबराच वेळ लागत होता.
आर्थिक घोटाळ्यांतील या आरोपींविरोधात सीबीआय आणि ईडीच्यावतीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीचे प्रकरण नव्या अध्यादेशानुसार चालवले जाणार आहे. ईडीने मल्या प्रकरणात आजवर ९,८९० कोटी आणि नीरव मोदी-चोक्सी यांच्या प्रकरणात ७,६६४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, नव्या अध्यादेशानुसार, पहिली कारवाई १५,००० कोटी रुपयांची संपत्ती जप्त होऊ शकते. यापुढील प्रकरणांमध्येही अशीच कारवाई होणार आहे.