‘या’ प्रसिद्ध गायकावर तस्करीचा आरोप ; ईडीची नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. खान यांनी परकीय चलनाची तस्करी केल्याचा संशय आहे. या प्रकरणी त्याच्याकडून योग्य खुलासा न केला गेल्यास त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

राहत फतेह अली खान यांची २०११ मध्ये दिल्लीतील विमानतळावर तपासणी करण्यात आली होती. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी राहत फतेह अली खान यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे १.२४ लाख अमेरिकी डॉलर सापडले होते. चौकशी दरम्यान इतकी रक्कम कुठून आली, याची माहिती खान देऊ शकले नाही. २००९ मध्ये ‘लागी तुमसे मन की लगन’ या गाण्यासह त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून त्यांनी परकीय चलनाच्या माध्यमातून प्रचंड कमाई केली आहे. पण त्याचा कोणताही हिशेब आयकर विभागाला दिलेला नाही. या चलनाची ते देशाबाहेर तस्करीही करत असल्याचंही आढळून आलं आहे.

‘फेमा’ (परकीय चलन व्यवस्थापन कायदा ) अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांचा तपास ईडीकडून केला जातो. सध्या हे प्रकरण ईडीकडे आहे. या प्रकरणात ईडीने आता खान यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राहत फतेह अली खान समाधानकारक उत्तर देण्यात अपयशी ठरल्यास त्यांच्या अडचणी वाढू शकतात. त्यांच्यावर ३०० टक्के दंड आकारला जाऊ शकतो. तसेच भारतात लूक आऊट नोटीस देखील जारी केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.