JEE Main & NEET 2020 : सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळली, परीक्षा नियोजित केलेल्या तारखेलाच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेईई मेन २०२० प्रवेश परीक्षा १ सप्टेंबरपासून आणि नीट २०२० ची परीक्षा १३ सप्टेंबरपासून पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

सुनावणीतील मुख्य मुद्दे
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान विद्यार्थ्यांची बाजू मांडणारे वकील अलख यांचे सबमिशन सुरू केल्यावर न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी विचारले की, जर परीक्षा घेतल्या नाही तर यामुळे देशाचे नुकसान होणार नाही का? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्राचे नुकसान होईल. परीक्षा सावधगिरीने का घेतली जाऊ शकत नाही? त्याचबरोबर एनटीएची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, परीक्षा पुरेशा सावधगिरीने घ्याव्यात. त्यानंतर वकील अलख म्हणाले की, कोविड-१९ लस लवकरच येण्याची शक्यता आहे, ज्याबाबत पंतप्रधान मोदींनी १५ ऑगस्ट रोजी आपल्या भाषणात म्हटले होते. ते म्हणाले की, परीक्षा अनिश्चित काळासाठी नाही तर काही काळासाठी पुढे ढकलली पाहिजे.

जेईई मेन २०२० प्रवेश परीक्षा १ सप्टेंबरपासून आणि नीट २०२० परीक्षा १३ सप्टेंबरपासून पुढे ढकलण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरुण मिश्रा, न्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायाधीश कृष्ण मुरारी यांचे खंडपीठ करत आहे. कोविड-१९ महामारी काळात २० लाखाहून अधिक विद्यार्थी दोन्ही प्रवेश परीक्षा आयोजित करण्याच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत.

नीट २०२० आणि जेईई मेन २०२० प्रवेश परीक्षांच्या स्थगितीबाबत याचिका
सुप्रीम कोर्टात नीट २०२० आणि जेईई मेन २०२० प्रवेश परीक्षा घेण्याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर आज १७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. देशभरातील कोविड-१९ महामारी दरम्यान परीक्षा घेऊ नयेत आणि त्यांच्या तारखांना सद्यस्थितीसाठी पुढे ढकलण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. दोन्ही परीक्षा आयोजित करणारी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) कडून जेईई मेन २०२० ची परीक्षा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर या कालावधीत आयोजित केली जाईल. त्याचबरोबर एजन्सीने १३ सप्टेंबर रोजी नीट २०२० परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २० लाखाहून अधिक उमेदवारांनी दोन्ही परीक्षांसाठी नोंदणी केली आहे. याचिकेनुसार, एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या शारीरिक स्वरूपात परीक्षेत सामील होण्यामुळे महामारीचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

नीट २०२० आणि जेईई मेन २०२० स्थगित न करण्याबाबत देखील याचिका
एकीकडे देशभरातील अनेक विद्यार्थी आणि पालकांनी नीट २०२० आणि जेईई मेन २०२० प्रवेश परीक्षा आयोजित न करण्यासाठी आणि पुढे ढकलण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. तर दुसरीकडे अनेक विद्यार्थ्यांनी व पालकांच्या दुसर्‍या गटाने परीक्षेचे आयोजन लांबणीवर न लावण्यासाठी याचिका दाखल केली आहे. गुजरात पालक संघटनेने दाखल केलेल्या या याचिकेत मागणी केली आहे की, दोन्ही प्रवेश परीक्षा नियोजित तारखेला व वेळेतच घेण्यात याव्यात. अगोदरच परीक्षा पुढे ढकलल्यामुळे शैक्षणिक सत्राच्या कालावधीचे नुकसान झाले आहे. तसेच वारंवार परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढत आहे.