ईदचा चंद्र दिसला, उद्या देशभरात ‘रमजान ईद’ साजरी होणार

मुंबई : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये ईदच्या चंद्राचे दर्शन झाल्याने उद्या बुधवारी देशभरात रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. पुणे आणि मुंबईत हिलाल सीरत कमिटीची बैठक पार पडली. यावेळी चंद्रदर्शन झाल्याने ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्या रमजान ईद साजरी होणार असल्याने देशभरातील मशिदींवर रोषणाई करण्यात आली आहे.

मुंबई आणि मुंबईत हिलाल सीरत कमिटीची संध्याकाळी उशिरापर्यंत बैठक सुरू होती. यावेळी चंद्रदर्शन निश्चित झाल्याने संपूर्ण देशात रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतातच नव्हे तर पाकिस्तान, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडातील इतर देशातही उद्या ५ जून रोजी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. तर सौदी अरेबियात आजच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

गेला महिनाभर देशभरात रमजानचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. ज्या दिवशी ईदचा चंद्र दिसतो तो रमजानचा शेवटचा दिवस समजला जातो. रमजान संपल्यानंतर ईद-उल-फितर साजरी केली जाते. रमजान हा मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र सण मानला जातो. रमजानच्या कालावधीत मुस्लिम बांधव आपल्या कुटुंबियांची भेट घेऊन सणाच्या शुभेच्छा देतात. रमजानचा पवित्र महिना ३० दिवस चालतो. मात्र यावेळी ५ जून रोजीच रमजान ईद साजरी होणार असल्याने रमजानचा महिना केवळ २९ दिवसांचाच असेल. २०१८मध्ये १६ जून रोजी रमजान ईद साजरी करण्यात आली होती.