धक्कादायक ! 7 कोटींच्या दरोड्याप्रकरणी 9 जणांना अटक, पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्यानं खळबळ

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात  कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत जीव धोक्यात घालून पोलीस काम करीत आहेत.  दुसरीकडे काही पोलिसांमुळे पोलीस दलाची मान शरमेने झुकत आहे. मुंबईतील अंधेरी एमआयडीसी परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या दरोड्याप्रकरणी एका पोलीस शिपायाला अटक करण्यात आली आहे. संतोष राठोड असे पोलिसाचे नाव असून कोर्टाने त्याला 6 मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या चोरीमध्ये मदत केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला  आहे.

लॉकडाऊनचा फायदा घेत अंधेरीच्या एमआयडीसीमधील नीरज इंडस्ट्री या गोल्ड मेकिंग कंपनीतून चोरट्यांनी 7 कोटी 9 लाख रुपयांचा ऐवज लुटला होता. हा प्रकार उघडकीस आल्यावर एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आणि गुप्त माहितीच्या आधारे अत्यंत क्लिष्ट अशा गुन्ह्याचा तपास करत चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. चोरट्यांनी कंपनीत घुसून सात कोटींपेक्षा किमतीचा ऐवज पळवला होता. कंपनीच्या सुरक्षा रक्षकाच्या मदतीने आरोपींनी इमारतीत प्रवेश करीत कंपनीचा छताचा सिमेंटचा पत्रा तोडून आत शिरले होते.  लोखंडी तिजोरी ग्राईंडर कटरने कापून आतील सोन्याचे हिरेजडीत दागिने,  हिरे आणि इतर दागिने बनवण्याकरता आवश्यक असलेले सोने असा एकूण 7 कोटी 9 लाख 48 हजार 992 रुपयांचा ऐवज चोरला. कंपनी मालकाला चोरी झाल्याची माहिती 22 एप्रिल रोजी समजली आणि त्याने याची तक्रार एमआयडीसी पोलिसांत केली.

पोलिसांनी तातडीने  वसई, गोरेगाव, कुर्ला, पवई, अंधेरी एमआयडीसी परिसरात आरोपींचा शोध घेतला. कंपनीतील सीसीटीव्हीत संबंधित घटना कैद झाली होती. कंपनी मालकाच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांनी या सीसीटीव्ही फूटेज आणि इतर माहितीच्या आधारे मुख्य आरोपी विपुल चांबरियासह सात चोरांना अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता, पोलिसांनी मागील दोन दिवसात आणखी दोघांना अटक केली, ज्यात ओशिवारा पोलीस स्टेशनमधील कर्मचार्‍याचा समावेश आहे. या चोरीमध्ये चोरट्यांना मदत केल्याचा आरोप संतोष राठोडवर आहे.