ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रुमची गेली लाईट आणि सीसीटीव्हीही बंद

भोपाळ :  पोलीसनामा ऑनलाइन – भोपाळमध्ये ज्या स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहेत. तेथील वीज पुरवठा अचानक खंडीत झाल्याने सीसीटीव्ही कॅमेरे जवळपास तासभर बंद झाले असल्याची माहिती पुढे आली आहे. ही बाब निवडणुक आयोगाने मान्य केली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमधील निवडणुकीतील निकाल बदलवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचे मोठे षड्यंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

याबाबत निवडणूक आयोगाने म्हटले की, सागरमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्णत: पार पडल्यानंतर दोन दिवसांनंतर ईव्हीएम जमा केल्याप्रकरणी एका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. भोपाळ आणि सागरमधील प्रकरण समोर आल्यानंतर ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, भोपाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार ३० नोव्हेंबरला वीज पुरवठा खंडीत झाल्यानं स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे आणि एलईडी डिस्पले सकाळी ८.१९ वाजल्यापासून ते सकाळी ९़.३५ वाजेपर्यंत बंद होते. या कारणामुळे कोणतेही रेकॉर्डिंग होऊ शकले नाही. यानंतर एक अतिरिक्त एलईडी स्क्रीन, इनर्व्हटर आणि जेनरेटरची व्यवस्था करण्यात आली.

निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे की, आता सर्व कॅमेरे व्यवस्थित काम करत आहेत आणि चोख सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. स्ट्राँग रुमच्या उघडे ठेवण्यात आलेल्या एका दाराबाबतही काँग्रेसने तक्रार केली होती. काँग्रेसच्या तक्राराची गांभीर्याने दखल घेत हे दार तातडीने बंद केले.