पुण्यात 30 जानेवारीला होणार एल्गार परिषद, पोलिसांनी दिली परवानगी; पण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे पोलिसांनी अखेर एल्गार परिषदेला (elgar parishad) परवानगी दिली आहे. त्यानुसार एल्गार परिषदेचे आयोजन येत्या शनिवारी ( दि. 30 जानेवारी) करण्यात आले आहे. निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी परिषदेला (elgar parishad) परवानगी मिळावी, यासाठी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला होता. त्यानंतर पोलिसांनी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ही एल्गार परिषद होणार आहे. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे शासनाने नियमावली ठरवून दिली आहे. त्यामुळे फक्त 200 जणांना या परिषदेस उपस्थित राहण्याची परवानगी दिल्याची माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी दिली.

गेल्या महिन्यात 31 डिसेंबर 2020 रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला होता. मात्र त्यावेळी पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था आणि कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्‍वभुमीवर परिषदेला परवानगी नाकारली होती. 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवार वाड्याच्या प्रांगणात एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगाव येथे दोन गटात वाद होऊन हिंसाचार झाला होता. एल्गार परिषदेमुळे हिंसाचार भडकला होता, असा ठपका पोलिसांकडून ठेवण्यात आला होता.