आ. अनिल गोटेंचा पुन्हा हल्लाबोल, ईव्हीएममधील हेराफेरीमुळेच गिरीश महाजन यांना यश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ज्या निवडणुकांचे मॅनेजमेंट करतात, त्या ठिकाणी भाजपाला निर्विवाद विजय कसा मिळतो याचे रहस्य आता उघड झाले आहे. मतदान यंत्रात म्हणजेच ईव्हीएममध्ये हेराफेरी करूनच हे सर्व विजय त्यांनी प्राप्त केले आहेत. त्यासाठी हैदराबाद येथील एका हॅकरची मदत घेण्यात आली असल्याचा खळबळजनक आरोप आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. याबाबत आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचेही त्यांनी सांगितले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मात्र अनिल गोटे यांचे सर्व आरोप साफ फेटाळून लावले असून, पराभवातून आलेल्या नैराश्यापोटी ते असे बेताल आरोप करत असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आ. गोटे यांनी हे आरोप केले. आरोपांच्या पुष्ट्यर्थ त्यांनी काही व्यक्तीच्या फोनवरील संभाषणाच्या रेकॉर्डही ऐकून दाखवल्या. धुळे पालिका निवडणुकांचे निकाल गिरीश महाजन यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणेच लागले. महाजन यांच्या मतदारसंघातील शेंदुर्णा येथे आजपर्यंत भाजपा कधीही विजयी होऊ शकला नाही. पण अचानकपणे तेथे नगराध्यक्षासह १४ उमेदवार विजयी झाले.

जामनेर या महाजनांच्या गावात नगरपरिषदेच्या निवडणुकीत २५ पैकी २५ जागा निवडून आल्या. या सर्व यशामागे ईव्हीएममधील हेराफेरी कारणीभूत आहे. त्यासाठी हैदराबाद येथील एका हॅकरची मदत घेण्यात आली. हॅकिंग करण्यासाठी मतदान होणाऱ्या ठिकाणी तसेच मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या ठिकाणी जीओ आणि व्होडाफोनचे मोबाइल टॉवर युद्धपातळीवर उभारण्यात आले. महापालिकेची त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. अधिकारीदेखील मॅनेज करण्यात आले. याबाबतचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत. मात्र, निवडणूक आयोग, पोलीस यांच्याकडे तक्रार करूनही आपल्­याला दाद मिळालेली नाही, असेही अनिल गोटे म्­हणाले.