10 वी,12वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! ‘या’ अडचणी आल्यास जूनमध्ये देता येईल परीक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा देणारी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. मात्र कोरोनामुळे 10 वी आणि 12 वीचे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न उभे ठाकले होते. मात्र, शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

संबंधित विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थांच्या घरात किंवा परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो रहात असलेला भाग सील करण्यात आला असेल. तर अशा विद्यार्थ्यांना सध्याच्या घोषीत तारखेला परीक्षा देता येणार नाही. या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. अशातच दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतल्याने या परीक्षांबाबत मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात. अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली होती. मात्र, परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अनेकजण चिंतेत असताना यावर देखील उपाय काढला असून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.