घराणेशाहीच्या आरोपावर सारा अली खाननं दिलं ‘सडेतोड’ उत्तर, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेली काही वर्षे बॉलिवूडच्या इतिहासात एका शब्दावर सर्वाधिक वाद झाला आहे, तो शब्द म्हणजे नेपोटिझम ऊर्फ घराणेशाही. अर्थात घराणेशाही आजकाल सर्वच क्षेत्रांत परवलीचा शब्द बनला आहे. राजकारण, क्रीडा, बॉलीवूड, मॉलिवूड कोठेही पाहा, या शब्दाने खळबळ उडवून दिली आहे.

कॉफी विथ करण या कार्यक्रमात कंगना राणावतने बॉलीवूडमधील घराणेशाहीबद्दल काही वादग्रस्त विधाने केली आणि या विषयाने जणू बॉलीवूडच व्यापून टाकले. खरेतर घराणेशाही बॉलीवूडच्या सुरुवातीपासूनच होती मात्र या वादाला तोंड फोडले ते कंगनाने. तेव्हापासून घराणेशाहीच्या विषयाला प्रत्येक स्टारकिडला सामोरे जावे लागले आहे. नुकतेच या विषयावरील आपल्या मतप्रदर्शनाने अनन्या पांडे या नटीला अडचणीत यावे लागले व मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावरील ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.

मात्र प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. काहीजण घराणेशाहीच्या अगदी टोकाचे विरोधी असले तरी त्या स्टारकिड्सचे काय, जे अत्यंत सुंदर आणि ताकदीचा अभिनय करतात व ते एखाद्या मोठ्या फिल्मी कुटुंबाचे सदस्य आहेत. अर्थातच हा वाद अनादि आणि अनंत असाच राहील.

या सार्‍या प्रकारावर मात्र सारा अली खान या सैफकन्येने सडेतोड उत्तर तिच्या टीकाकारांना दिले आहे. आपल्याला आपले पालक फिल्मस्टार असल्याचे दडपण कधी येते का, या पत्रकारांच्या प्रश्‍नाला तिने अतिशय निर्भीडपणे उत्तर दिले. ती म्हणाली की एखाद्या गोष्टीचे किती दडपण घ्यायचे हे ज्याच्या – त्याच्यावर अवलंबून आहे. मला माझे काम आवडते. या कामाकडे मी दडपण म्हणून कधी पाहत नाही. माझे आई – बाबा, सैफ आणि अमृता सिंग यांची मुलगी म्हणून मी जर घाबरून काम केले तर माझे काम उत्कृष्ट होणार नाही.

म्हणूनच असे दडपण न घेणेच शहाणपणाचे होईल. स्टारकिड असल्याचा फायदा मला मिळतो, ही वस्तुस्थिती आहे. सैफ – अमृता माझे आई – वडील असले, मला त्यांच्याबद्दल खूप आदर असला तरी आयुष्यात मला आणखी काहीतरी मिळवायचे आहे. प्रत्येकाला स्वतःचा प्रवास स्वत:च करावा लागतो. शिवाय प्रेक्षकही सूज्ञ असतात, हे वेगळे सांगायला नकोच. आपल्या स्वत:मधील गुणांमुळेच एखादा माणूस पुढे जाऊ शकतो.