गुन्हे शाखेच्या सहायक फाैजदार, कर्मचाऱ्यांवर खंडणी, मारहाणीचा गुन्हा दाखल 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन- मोबाईल टॉवरच्या चोरीच्या बॅटऱ्या घेतल्याच्या संशयावरून भंगार दुकानातील कामगारांना चौकशीला आणून, त्यांना बेदम मारहाण करून,  एका कामगाराला ‘शॉक’ देऊन मालकाकडून साडेआठ लाख रुपये घेतल्या प्रकरणी गुन्हे शाखेतील सहायक फाैजदार, त्याचा साथीदार आणि इतरांवर खंडणीचा गुन्हा शुक्रवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी या प्रकरणाची खात्री करून कारवाईचे आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या प्रकरणी इस्तीयाक उर्फ मुस्ताक महलू खान (३०, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. तर गुन्हे शाखेचे सहायक फाैजदार रमेश नाळे, कर्मचारी केदारी आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश नाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २० नोव्हेंबर रोजी रात्री आणि २१ नोव्हेंबर रोजी रात्री खान यांच्या भंगार दुकानातील कामगार सुमित यादव, अब्दुल खान, सर्वेश गौतम, मोहम्मद खान, अब्दुल करीम खान,  वसीम खान, अनुकुमार खान या सर्वांना चौकशीसाठी गुन्हे शाखा युनिट एकच्या कार्यलायत आणले. चोरुन आणलेल्या मोबाईल टॉवरच्या बॅटरी घेत असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी रमेश नाळे यांनी चौकशी करुन कामगाराना बेदम मारहाण केली. तसेच त्यातील एकाला विजेचा शॉक देखील दिल्याचे आरोप होत आहेत.

या सर्वांना आणि मालकाला गुन्हा दाखल न करता सोडून देण्यासाठी नाळे यांनी त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. इस्तीयाक उर्फ मुस्ताक महलू खान यांच्याकडून साडे पाच लाख रुपये आणि भागीदार धनराज अकोदीया यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन सोडून दिले. दरम्यान, नाळे यांनी तरुणाला बेदम मारहाण करुन त्याला शॉक देऊन पैसे उकळल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. हा सर्व प्रकार तरुणाच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांसमोर आणल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची दखल घेत पोलीस आयुक्तांनी रमेश नाळे आणि त्यांच्या साथीदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरचे प्रकरण हे गंभीर असून संबंधीत कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना न सांगताच स्वत: परस्पर निर्णय घेतले आहेत. या प्रकरणाची खातरजमा करुन संबंधीत कर्मचाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून पुढील योग्य कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us