आता कोणाचंही पेज Facebook वर Like करता येणार नाही

पोलीसनामा ऑनलाईन टीम : दिग्गज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने नवीन वर्षाच्या सुरुवातीस काही मोठे बदल केले आहेत. ते म्हणजे आपल्या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपच्या पॉलिसीमध्ये फेसबुकने बदल केले असून आता कंपनीने फेसबुक पब्लिक पेजमधून ‘Like’ हे बटण देखील हटवले आहे. फेसबुकने नेते, खेळाडू, कलाकार, लोकप्रिय व्यक्तिमत्व, अन्य संस्था व ब्रँड्सद्वारे बनवलेल्या पब्लिक पेजला रिडिझाइन केले आहे आणि ‘Like’ बटनला पेजमधून हटवले आहे.

‘Like’ बटण पेजमधून काढून टाकल्याने आता केवळ फॉलोअर्स फेसबुक पेजवर दिसतील, त्याचप्रमाणे एक असे वेगळे न्यूज फीड असेल जेथे वापरकर्ते कन्व्हर्सेशनमध्ये सहभागी होऊ शकतील. लाईक आणि फॉलोसारखे दोन पर्याय फेसबुकवर आपल्याला दिसत होते. पण आता तुम्हाला अपडेट केल्यानंतर फक्त फॉलो हेच ऑप्शन दिसेल. तथापि, कंपनीने असे देखील स्पष्ट केले आहे की आपल्याला पूर्वीप्रमाणेच एखाद्या पोस्टसाठी लाइक बटन मिळेल.

विशेष म्हणजे ‘Like’ बटण काढून टाकल्याने पब्लिक पेजवर कंटेंटची क्वालिटी आणखी सुधारण्यास मदत होणार आहे, यामागील मुख्य हेतू म्हणजे फॉलोअर्सना त्यांच्या आवडीच्या पेजसोबत कनेक्ट होण्याची प्रक्रिया सोपी करणे हा आहे असे कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. एका ब्लॉगच्या माध्यमातून फेसबुकने नव्या अपडेटबाबतची माहिती दिली.