Fact Check : …म्हणून काय ‘या’ शास्त्रज्ञांनी रामदेव बाबा यांच्या ‘कोरोनिल’ औषधावर आणली बंदी ? जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पतंजलीने असा दावा केला की त्यांनी कोविड -19 वर प्रभावी कोरोनिल (Coronil) हे औषध शोधले आहे. यानंतर आयुष मंत्रालयाने बाबा रामदेव यांच्या या औषधाचा कोरोना विषाणूचे औषध म्हणून प्रसार करण्यास थांबवले. आता सोशल मीडियावर एक मॅसेज व्हायरल होत असून त्यात असा दावा केला आहे की आयुष मंत्रालयातील औषधांवर संशोधन व मान्यता देणार्‍या वैज्ञानिक पॅनेलच्या मुस्लिम शास्त्रज्ञांनी ‘कोरोनिल’ वर बंदी घातली आहे. इतकेच नाही तर औषधावर बंदी घालणाऱ्या 6 मुस्लिम शास्त्रज्ञांची नावेही या संदेशात देण्यात आली आहेत. यानंतर, हा मॅसेज खूप वेगाने व्हायरल झाला. आयुष मंत्रालयाच्या याच वैज्ञानिकांनी पतंजलीच्या औषधावर बंदी घातली आहे का? या यादीमध्ये नमूद केलेले वैज्ञानिक आयुष मंत्रालयात आहेत की नाहीत याबाबत जाणून घेऊया.

व्हायरल मॅसेजमध्ये आयुष मंत्रालयातील औषधांवर संशोधन व मान्यता देणार्‍या वैज्ञानिक पॅनेलच्या सर्वोच्च 6 शास्त्रज्ञांची नावे असीम खान, मुनावर काझमी, खादिरुण निशा, मकबूल अहमद खान, आसिया खानुम, शागुफ्ता परवीन अशी आहेत.

https://twitter.com/ASR_21_A/status/1276889943793491969

केंद्रानेच शास्त्रज्ञांची यादी बनावट असल्याचे सांगितले आहे

हा मॅसेज व्हायरल झाल्यानंतर लोकांनी केंद्र सरकार आणि आयुष मंत्रालयाला लक्ष्य केले. त्यानंतर भारत सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेकच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सरकारने ट्विट केले की आयुष मंत्रालयात असे कोणतेही पॅनेल नाही. या ट्विटवरून हे स्पष्ट झाले की आयुष मंत्रालयात औषधांना मंजुरी देणाऱ्या पॅनेलच्या सदस्यांच्या नावांची यादी बनावट आहे, जी स्वत: केंद्र सरकारने चुकीची जाहीर केली आहे.

राज्य जारी करतात आयुर्वेदिक औषधांसाठीचे परवाने

आयुर्वेदिक औषधांचे परवाने राज्य सरकारांच्या आयुष मंत्रालयाकडून दिले जाते. उत्तराखंड आयुर्वेद विभागाचे परवाना अधिकारी डॉ. वाय.एस. रावत यांनी कोरोनिलवरील वाद वाढल्यानंतर सांगितले होते की पतंजलीला खोकला-ताप ठीक करणे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याऱ्या औषधासाठी परवाना देण्यात आला होता. तसेच यासोबत त्यांनी सांगितले की पतंजलीच्या आवेदनात कोविड -19 साथीचे औषध बनवण्याचा कोणताही उल्लेख नव्हता आणि त्यासाठी कोणताही परवाना देण्यात आलेला नव्हता.

यादीमध्ये दिलेले वैज्ञानिक सीसीआरयूएममध्ये आहेत

आता प्रश्न उपस्थित होतो की, जर हे वैज्ञानिक अशा कोणत्याही पॅनेलमध्ये नसतील तर त्यांचे नाव कोठून आले? आयुष मंत्रालयाच्या वेबसाइटवर त्यांच्याशी संलग्न संस्था आणि त्यांच्या अधिकाऱ्यांविषयी माहिती देखील उपलब्ध आहे. तपास केल्यावर असे आढळले की या यादीमध्ये असणारे असीम अली खान केंद्रीय युनानी वैद्यकीय संशोधन परिषद (सीसीआरयूएम) मध्ये आहेत. ही परिषद आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. या यादीमध्ये समाविष्ट केलेले उर्वरित 5 शास्त्रज्ञही सीसीआरयूएममध्ये आहेत. त्यांचा आयुर्वेदिक औषधांशी काही संबंध नाही. हे सर्व युनानी वैद्यकीय सराव आणि औषधांशी संबंधित आहेत.