फडणवीसजी, पंतप्रधानांनी ‘मन की बात ‘ मध्ये दिलेल्या मोफत लसीच्या आश्वासनाचे काय झाले… ?, माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  देशातील प्रत्येक पात्र नागरिकाला कोविड प्रतिबंधक लस मोफत दिली जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिले, त्याचा हवाला देऊन भाषणे करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही मोफत लस गेली कुठे ? हे सांगावे, अशी विचारणा माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मोहन जोशी यांनी पत्रही पाठविले आहे. देशातील प्रत्येक पात्र नागरिकाला मोफत लस टोचली जाईल आणि राज्यावर लसीकरणाचा भार पडणार नाही, अशी ग्वाही मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी दिल्याचे एका वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सांगितले होते.परन्तु सध्या लसीकरणाच्या दराचा घोळ चालू आहे. साथ नियंत्रणासाठी लसीकरणाचे महत्त्व ओळखून मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी लस खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे. पण, पंतप्रधानांच्या मोफत लसीकरण आश्वासनाचे काय झाले ? हा प्रश्न उरतोच. विरोधी पक्षनेत्यांनी याचे उत्तर द्यायला हवे, असे मोहन जोशी यांनी पत्रात म्हटले आहे.

लसीकरण हा राष्ट्रीय कार्यक्रम असून केंद्र सरकारने मोफत लस द्यायला हवी असे सर्वोच्च न्यायालयाचे मताचाही उल्लेख जोशी यांनी पत्रात केला आहे. लस उपलब्ध होत नसल्याने सध्या लसीकरण मोहीम जवळ जवळ ठप्प झाली आहे, याकडेही पत्रात जोशी यांनी लक्ष वेधले आहे.