आईला कॅन्सर झाल्याचं सांगून जेलच्या बाहेर पडायचं होतं कैद्याला, मुंबई हायकोर्टाकडून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्राचा पर्दाफाश

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – तुरुंगात असताना कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर पडण्यासाठी कैद्यांचा प्रयत्न असतो. असाच एक प्रयत्न एका कैद्याकडून सुरु होता पण जेव्हा याची खरी माहिती समजली तेव्हा मात्र न्यायालयाने त्याला चांगलाच धडा शिकवला. तसेच त्या कैद्याला दंडही ठोठावला.

रंजीत शाहजी गडे असे या कैद्याचे नाव आहे. तो उस्मानाबाद येथील तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पण तुरुंगातून बाहेर येण्यासाठी त्याने सहा महिन्यांच्या अस्थायी जामिनासाठी अर्ज केला. त्यासाठी त्याने आईला ब्रेस्ट कॅन्सर आणि डायबिटीसचा त्रास असल्याचे सांगितले. रंजीत गडे याने उस्मानाबाद सिव्हिल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून 27 ऑक्टोबर, 2020 ला जारी केलेले बनावट मेडिकल सर्टिफिकेटही जोडले होते. पण या सर्टिफिकेटवर न्यायाधीश साधना एस. जाधव आणि न्यायाधीश नितीन आर. बोरकर यांना संशय आला. तेव्हा त्यांनी सरकारी वकिलांमार्फत याप्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले. त्यानंतर अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी उस्मानाबाद रुग्णालयाच्या सिव्हिल सर्जन यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा हे सर्टिफिकेट रुग्णालयाकडून दिले नसल्याचे स्पष्ट झाले. हे सर्टिफिकेट बनावट असल्याचे समजले.

कैद्याच्या आईचा घेतला जबाब
रंजीत गडे याची आई कंचनबाई यांचा जबाबही पोलिसांनी घेतला. उस्मानाबाद सिव्हिल रुग्णालयात उपचारासंबंधी कोणतेही कागदपत्रे नाहीत. रंजीत याला मेडिकल सर्टिफिकेट बनविण्यासाठी कोणी मदत केली याची माहिती नाही, असेही तिने सांगितले.

5 हजार रुपयांचा दंड
उस्मानाबाद रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या शिक्क्याचा दुरुपयोग बनावट सर्टिफिकेट बनविण्यासाठी केला, ही एक गंभीर बाब आहे. ज्यांनी या बनावट शिक्क्याचा दुरुपयोग केला, अशा लोकांविरोधात गरज असल्यास तक्रार देण्याचे आदेशही न्यायालायने दिले आहेत. हा प्रकार म्हणजे न्यायालयाची दिशाभूल करण्याचाच आहे. त्यामुळे रंजीत गडे याची अस्थायी जामिन याचिका रद्द केली आणि त्यासह त्याला 5 हजार रुपयांचा दंडही न्यायालायने ठोठावला.