Bihar Assembly Election 2020 : बिहार निवडणुकीत राजकारणाचा आखाड्यात कौटुंबिक विषय

पाटणा : वृत्तसंस्था – बिहार निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. निवडणूक आता अवघ्या आठवड्यावर आहे. मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या नेतृत्वातील एनडीएविरोधात राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने शड्डू ठोकला आहे. निवडणुकीत कौटुंबिक बाबींनाही राजकारणाचा आखाडा बनवला जात असल्याचे चित्र आहे.

महाआघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव हे आहेत. ऐश्वर्या रायने याआधी लालूंच्या कुंटुंबावर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला आहे. ऐश्यर्या राय या तेजप्रताप यादव यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या घटस्फोटाचा विषय आता न्यायलयात प्रलंबित आहे. लालू प्रसाद यादव यांच्या घटस्फोटीत सुनेने नितीश कुमारांना समर्थन दिले आहे.

तेजप्रताप यादव आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाचा उल्लेख करत नितीश कुमारांनी म्हटलं की, एका सुशिक्षित मुलीसोबत असा दुर्व्यवहार केला गेला. प्रकृतीने अशा कृत्यासाठी काही ना काही तरी व्यवस्था केलीच असेल. नितीश कुमारांनी प्राप्त परिस्थितीत याचा राजकीय फायदा घेण्याची संधी सोडली नाही. त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या सुनेची बाजू लोकांसमोर मांडली.

परसा विधानसभा मतदार संघात चंद्रिका राय जेडीयूचे उमेदवार आहेत. ते याच मतदार संघातून मागच्या वेळी राजदच्या तिकीटावर निवडणूक जिंकले होते. मात्र, आता या घटस्फोटाने बिघडलेल्या नातेसंबंधामुळे त्यांनी पक्ष सोडून जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे. यादरम्यानच त्यांच्या मुलगी ऐश्वर्या रायचा लालू प्रसाद यादव यांच्या मोठ्या मुलासोबत म्हणजे तेजप्रताप यादवसोबत विवाह झाला. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही.

परसा विधानसभा मतदार संघात प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी आलेल्या नितीश कुमार यांच्याजवळ मंचावर जाऊन ऐश्वर्या राय यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला. तिने आपल्या अगदी लहान भाषणात म्हटलं की, मी तुम्हाला आवाहन करते की माझ्या वडिलांना भरघोस मतांनी विजयी करा. नितीश कुमार हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदी राहतील यासाठी मतदान करा. यावेळी मी माझ्या वडीलांसाठी मत मागायला आली आहे. ही परसा विधानसभेच्या मान – सन्मानाची बाब आहे.

“त्यांच्या लग्नात आम्ही गेलो होतो. मात्र, त्यानंतर जे झालं ते कुणालाच आवडलेलं नाहीये. यासोबतच त्यांनी म्हटलं की, महिलांचा अपमान आणि त्यांच्यासोबत असा व्यवहार करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांना आता हे समजत नसेल, मात्र, भविष्यात महिलेच्या विरोधात केल्या गेल्या या कृत्याची शिक्षा जरुर मिळेल. कारण, महिलांचा अपमान करणे खुपच भयावह आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.