मुजोर अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

परभणी : पोलीसनामा आॅनलाइन – शेतकऱ्याचा विरोध असताना त्याच्या शेतातील सागाची झाडे अधिकऱ्यांनी पोलिसांच्या बंदोबस्तात तोडली. शेतकऱ्याने विष प्राशन केले. अधिकाऱ्यांनी उघड्या डोळ्याने ही घटना पाहिली व मुजोरीचा परिचय दिला. जेव्हा शेतकरी जमिनीवर कोसळला तेव्हा त्याला इतरांनी रुग्णालयात पोहाचविले व अधिकाऱ्यांनी शेतातून पळ काढला. ही घटना सेलू तालुक्यातील सिंदी (रेल्वे) परिसरातील पळसगाव शेतशिवारात घडली.

अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव राजू विश्वनाथ भट (४८) असे आहे. त्यांची आई श्रीमती लिलाबाई विश्वनाथ भट यांच्या नावे शेत आहे. त्यांच्या शेतातून जाणाऱ्या टावर लाईन खाली शेतकऱ्याने लावलेली सागाची झाडे येतात. ही झाडे तोडण्याकरिता कोणताही मोबदला पावरग्रीड कंपनीने शेतकऱ्याला दिला नाही. पोलीस बंदोबस्त व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पावरग्रीडचे अधिकारी भट यांच्या शेतात पोहोचले. भट यांनी झाडे तोडण्यास विरोध केला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भट यांना पकडून ठेवले व झाडे तोडण्यास मजुरांनी प्रारंभ केला.

जिवापाड विरोध शेतकरीपुत्राने केला. पण अधिकारी जुमानत नसल्याचे पाहून राजू भट यांनी विष प्राशन केले. तो जमिनीवर कोसळताच त्याला इतरांनी सिंदी (रेल्वे) येथील शासकीय रुग्णालयात पोहाचविले. प्रकृती गंभीर झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. हल्ली त्याच्यावर जिल्हा रुगणालयात उपचार सुरू आहे.

टावरलाईन खाली येणारी झाडे तोडण्याचा प्रस्ताव कंपनीने अगोदर दिला होता. त्यावेळी निश्चित करण्यात आलेला मोबदला नगण्य होता. त्या मोबदल्यात झाडे तोडण्यास शेतकऱ्याने विरोध केला व संबंधित विभागाची पत्रव्यवहार केला. त्या सर्व प्रकाराला पावरग्रीड कंपनी जुमानली नाही. मंगळवार ४ डिसेंबरला शेतकऱ्याला झाडे तोडण्यात येणार असल्याची नोटीस देण्यात आली व ५ डिसेंबर रोजी पोलीस ताफ्यासह अधिकारी शेतात पोहोचले व कटरने झाडे तोडण्यास प्रारंभ केला. त्याला शेतकऱ्याने विरोध केला. पण मुजोर अधिकाऱ्यांनी त्या विरोधाला भीक न घालता मुजोरी कायम ठेवली. शेवटी शेतकऱ्याने वीष प्राशन केले. अधिकाऱ्यांविरूद्ध शेतकऱ्याने सिंदी (रेल्वे) पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

२०१९ मध्ये सत्तांतर निश्चित : पृथ्वीराज चव्हाण