1 जानेवारी 2021 पासून टोल प्लाजावर FASTag बंधनकारक, जाणून घ्या कसा मिळवायचा ‘फास्टॅग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इलेक्ट्रानिक पध्दतीचा टोल महसूल वाढविण्यासाठी सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांसाठी 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅग (FASTag) अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याबाबत एक नोटिफिकेशन जारी केले आहे. देशभरात सरकार फास्टॅगद्वारे टोल प्लाजाकडून पैसे घेणार असून टोल प्लाजावर पैशांची देवाण-घेवाण पूर्णपणे संपुष्ठात आणली जाणार आहे. सध्या देशातील 80 टक्के टोल प्लाजावर फास्टॅग सुविधा आहे. जी सरकारला डिसेंबरच्या शेवटपर्यंत 100 टक्के करायची आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या कारला फास्टॅग लावला नसेल, तर हायवेवर तुमची असुविधा होऊ शकते.

कसे काम करतो फास्टॅग : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयचा हा उपक्रम आहे. हे इलेक्ट्रॉनिक टोल संकलन तंत्र आहे. हा एक रेडिओ फ्रीक्वेंसी टॅग असून जो गाडीच्या पुढच्या काचेवर लावला जातो. टोल प्लाजावरून जाताना तेथे लावलेला सेन्सर हा टॅग रीड करेल. त्यानंतर फास्टॅगशी जोडलेल्या खात्यातून पैसे कट होतील.

कसा लावाल फास्टॅग : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानुसार, फास्टॅग ई-कॉमर्स वेबसाईट अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि पेटीएमवर उपलब्ध आहे. त्याशिवाय फास्टॅग बँक आणि पेट्रोल पंपवरूनही खरेदी करता येतो. ज्या बँकेत खाते आहे, त्याच बँकेतून फास्टॅग खरेदी करता येणार आहे.

कितीला मिळेल फास्टॅग : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानुसार, फास्टॅग कोणत्याही बँकेतून 200 रुपयामध्ये खरेदी करू शकता. फास्टॅग कमीत-कमी 100 रुपयांपासून रिचार्ज करू शकता. फास्टॅग खरेदी करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीच रजिस्ट्रेशन, फोटो आयडीसाठी पासपोर्ट, आधार कार्ड किंवा पॅन कार्डही देता येईल.