वडिल जेलमध्ये, आईने सोडून दिले, आता कुत्र्यासोबत फुटपाथवर झोपतो 10 वर्षांचा हा मुलगा, फोटो पाहून हेलावले लोकांचे मन

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये कुत्र्यासोबत एका फुटपाथवर झोपलेल्या मुलाच्या वायरल होत असलेल्या छायाचित्राने लोकांचे मन हेलावून टाकले आहे. अंकित नावाच्या छोट्या बालकाला हे सुद्धा आठवत नाही की तो कुठे राहणारा आहे. त्याला केवळ एवढेच आठवते की, वडिल जेलमध्ये आहेत आणि त्याच्या आईने त्याला सोडून दिले आहे. सध्या, त्याचा एकमेव मित्र त्याचा डॅनी नावाचा कुत्रा आहे, ज्याच्या सोबत तो फुटपाथवर झोपतो. तर, जिवंत राहण्यासाठी तो फुगे विकतो किंवा चहाच्या दुकानावर काम करतो.

अंकितचा चादरीत डॅनीसोबत झोपलेला असतानाचा एक फोटो या महिन्याच्या सुरूवातीला वायरल झाला होता. हा फोटो वायरल होताच स्थानिक प्रशासनाने मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली. मुजफ्फरनगर एसएसपी अभिषेक यादव यांनी मुलाला ट्रॅक केले. अखेर, सोमवारी हा मुलगा सापडला. सध्या तो जिल्हा पोलिसांच्या देखरेखी खाली आहे.

अंकित ज्या चहाच्या दुकानात काम करत होता, त्या मालकाने एका इंग्रजी वृत्तापत्राला सांगितले की, अंकितने अनेकदा काम केले आहे. डॅनीने कधीही त्या मुलाची साथ सोडली नाही. त्यांनी सांगितले की, जोपर्यंत मुलगा येथे काम करायाचा, तोपर्यंत डॅनी एका कोपर्‍यात बसलेला असायचा. अंकित खुप स्वाभिमानी आहे, तो कधीही काहीही मोफत घेत नव्हता. इतकेच नव्हे, त्याने आपल्या कुत्र्यासाठी दुध सुद्धा कधी कुणाकडून फुकट घेतले नाही.

एसएसपीने सांगितले की, आता तो मुजफ्फरनगर पोलिसांच्या देखरेखीखाली आहे. आम्ही त्याला ओळखणार्‍यांचा शोध घेत आहोत आणि त्याची छायाचित्रे आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या विविध पोलीस ठाण्यात पाठवण्यात आली आहेत. आम्ही जिल्हा महिला आणि बाल कल्याण विभागाला सुद्धा अलर्ट केले आहे.

शहर पोलीसचे अधिकारी अनिल कापरवान यांनी सांगितले की, अंकित शीला देवी नावाच्या महिलेच्या सोबत राहील. जोपर्यंत त्याच्या कुटुंबाची महिती मिळत नाही, मुलगा एका खासगी शाळेत शिक्षण घेईल. शाळेच्या प्रशासनाने अंकितला मोफत शिक्षण देण्याची पोलिसांची विनंती मान्य केली आहे.