पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या जावयाला सासऱ्याकडून मारहाण  

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नीला भेटण्यासाठी सासरवाडीत आलेल्या जावयासोबत झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाल्यानंतर सासऱ्याने जावयाच्या तोंडावर फरशीने मारहाण केली. हा प्रकार मांजरी येथे रविवारी दुपारी घडला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सासऱ्याला अटक केली आहे.

रानु पांडूरंग राखपसरे (५०, मांजरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर चंद्रकांत सुरेश लोंढे (२७, चंदनवाडी, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राखपसरे हे लोंढे यांचे सासरे आहेत. लोंढे यांचे पत्नीसोबत मागील एक वर्षापासून वाद सुरु असल्याने त्या मांजरी येथे वडीलांकडे राहण्यास आहेत. त्यामुळे लोंढे त्यांच्या पत्नीला व मुलाला भेटण्यासाठी अधूनमधून येत असतात. मात्र रविवारी ते आले तेव्हा राखपसरे यांनी आता कशाला आलात म्हणून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी राखपसरे यांनी तेथे पडलेला फरशीचा तुकडा त्यांच्या तोंडावर मारून जखमी केले. त्यानंतर त्यांच्या कारवरही दगड मारून काच फोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भोंगळे करत आहेत.