पुण्यातील ‘त्या’ बर्गर किंगला FDA ची नोटीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील बर्गर किंगमधील बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळून आले होते. त्यानंतर आता या आउटलेटच्या केलेल्या तपासणीमध्ये अन्न सुरक्षा मानदे कायद्यान्वये स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. त्यावरून अन्न व औषध प्रशासनाने बर्गर किंगला नोटीस जारी केली आहे. तसेच नोटीस मिळताच स्वच्छतेच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याची ताकीद देण्यात आली आहे.

१५ मे ला रिक्षाचालक साजिद अजमुद्दीन पठाण हे आपल्या मित्रांसह बर्गर खाण्यासाठी तेथे गेले होते. त्या वेळी अचानक त्यांना खोकला येऊन त्यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. त्यानंतर मित्रांनी पाहिले असता बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळले. काचेचे तुकडे खाल्ल्याने पठाण यांना तोंडात व पोटाच्या अंतर्भागात जखम झाली आहे. मित्रांनी पठाण यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांना थेट अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

हा प्रकार घडल्यानंतर १९ मे ला डेक्कन पोलिस ठाण्यात बर्गर किंगच्या डेक्कन एरिया मॅनेजर, स्टोअर मॅनेजर आणि सुपरवायझर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तातडीने फर्ग्युसन रस्त्यावरील बर्गर किंगच्या आउटलेटला भेट दिली. तेथील सर्व गोष्टींची तपासणी केली. त्या वेळी अन्न सुरक्षा मानदे कायद्यान्वये स्वच्छतेचे निकष पाळण्यात आले नसल्याचे आढळले. तेथील बर्गरचे नमुने काढण्यात आले. तसेच, स्वच्छता नसल्याने बर्गर किंगला सुधारणा नोटीस देण्याची कारवाई एफडीएने केली आहे.

दरम्यान, बर्गर किंगने स्वच्छतेबाबत ठरावीक मुदतीत सुधारणा करणे अपेक्षित आहे. तसे झाले नाही तर त्यावर अधिक कडक कारवाई करण्यात येईल, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.