मलकापूर : जखमी बिबट्याचा जीव वाचवण्यासाठी 15 तास स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन

मलकापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात बिबट्याची संख्या वाढली असून सगळीकडे बिबट्या सुटल्याची चर्चा आहे. जखमी बिबट्याचा जीव वाचवण्यासाठी १५ तास स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. कराड वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह कोल्हापूर येथील विशेष पथकाने ओढे- नाल्यांसह २० हेक्टर ऊसाचे क्षेत्र पिंजून काढूनही बिबट्या सापडला नाही. दरम्यान, अपघातानंतर उपलब्ध झालेल्या व्हिडिओतील हालचालीवरून त्याला मोठी दुखापत झाली नसल्यामुळे तो नैसर्गिक अधिवासात मार्गस्थ झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पंधरा तासानंतर जखमी बिबट्याची शोधमोहीम थांबवण्यात आली.

सिमेंटच्या जंगलात वाढ झाल्यामुळे नैसर्गिक जंगलाचा ऱ्हास होत आहे. परिणामी वन्यप्राण्यांचा नागरी वस्तीतील वावर दिवसेंदिवस वाढल्याने भक्षाच्या शोधात बाहेर पडणाऱ्या वन्यप्राण्यांच्या जिवावर बेतत आहे. गेल्या दहा दिवसात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू होण्याच्या चार घटना घडल्या आहेत. तर ऊसाच्या रानात मृत अवस्थेत बिबट्या सापडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. तसीच घटना नांदलापूर गावच्या हद्दीत पाचवडफाट्या नजीक हॉटेल समृद्धी समोर मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

अज्ञात वाहनाची धडक बसल्यानंतर अचानक बिबट्याने महामार्गावरच ठिय्या मारला. पंधरा मिनिटातच गर्दी बघून जखमी बिबाट्याने जीव वाचविण्यासाठी महामार्ग ओलांडून कृष्णा नदीकडील ऊसाच्या रानात धूम ठोकली होती. त्या दिवशी रात्रीच्यावेळी अधिकाऱ्यांसह प्राणिमीत्र व नागरिकांनी रात्री साडेबारा वाजेपर्यंत महामार्गालगत व ऊसाच्या बाजूने शोध घेतला बिबट्या आढळला नाही. साडे बारा वाजता शोधमोहीम थांबवली.

बुधवारी सकाळी पुन्हा साडेसात वाजता शोधमोहीम सुरू केली. बिबट्याचा जीव वाचवण्यासाठी स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. या शोधमोहीमेसाठी वन्यजीव सुरक्षाअंतर्गत फॉरेस्ट ट्रँकचा अवलंब करण्यात आला. तर बुधवारी सकाळपासूनच १५ तासात निनाई ओढ्याच्या दुतर्फा २० हेक्टर ऊसक्षेत्रात शोधमोहीम राबवली. या शोधमोहीमेत कराड वन विभागासह कोल्हापूर येथील विशेष पथकातील अकरा कर्मचाऱ्यांनी ओढे-नाल्यांसह झाडा-झुडपातून व ऊसाचे क्षेत्र पिंजून काढूनही बिबट्या सापडला नाही. दरम्यान अपघातानंतरचा एक व्हिडिओ वनविभागाला उपलब्ध झाला.

त्या व्हिडिओतील बिबट्याच्या गतीमान हालचालीवरून त्याला मोठी दुखापत झाली नसल्याचे जानवत आहे. त्यामुळे तो नैसर्गिक अधिवासात मार्गस्थ झाल्याचा अंदाज वर्तवत वनविभागाकडून पंधरा तासानंतर जखमी बिबट्याची शोधमोहीम थांबवण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

महामार्गाच्या पुर्वेस ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ऊसतोडणी सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी, ट्रक्टर चालक मालक, ऊसातोडणी मुकादम व मजूरांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसे कांही आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क करावा असे अवाहनही वनपाल ए पी सवाखंडे यांनी केले आहे.