‘त्या’ गाजलेल्या एन्कांऊटर प्रकरणाचा १३ वर्षांनी आज अंतिम निकाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणी मुंबईतील सीबीआय कोर्ट आज आपला अंतिम निकाल जाहीर करणार आहे. संपूर्ण देशभरात हा खटला सतत या ना त्या कारणामुळे गाजत राहिला. बदलत्या तपासयंत्रणा, बदलते न्यायाधीश, एकामागोमाग एक निर्दोष सुटणारे हायप्रोफाईल आरोपी आणि एकामागोमाग एक फितूर झालेले सरकारी साक्षीदार. मात्र शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश एस.जे. शर्मा हे या बहुचर्चित खटल्याचा अंतिम निकाल जाहीर करणार आहेत.

सीबीआयने आपल्या अंतिम युक्तिवादात कबूल केले होते की या तपासात आणि खटल्यात अनेक कच्चे दुवे राहिले आहेत. कारण घटनेच्या पाच वर्षांनंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आणि घटनेच्या तब्बल १२ वर्षांनंतर साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आहेत.

अहमदाबादच्या विशाला सर्कलजवळच्या टोलनाक्यावर २६ नोव्हेंबर २००५ मध्ये सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी हिला कथित बनावट चकमकीत ठार करण्यात आलं. तर या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आणि सोहराबुद्दीनचा साथीदार तुलसीराम प्रजापतीलाही गुजरात-राजस्थान सीमेजवळ चापरी इथे २७ डिसेंबर २००६ मध्ये आणखी एका कथित बनावट चकमकीत ठार करण्यात आल्याचा आरोप आहे. गुजरात एटीएसने राजकीय दबावात या हत्या केल्याचा आरोप झाल्यानंतर गुजरात सीआयडीकडून हा तपास २०१२ मध्ये सीबीआयकडे सोपवण्यात आला. त्यानंतर या खटल्याची निष्पक्ष सुनावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गुजरातमधील हे प्रकरण महाराष्ट्रातील न्यायालयात वर्ग केले.

या प्रकरणी सीबीआयने एकूण ३८ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. ज्यात भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, गुजरात एटीएसचे तात्कालीन प्रमुख डी.जी. वंझारा यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींच्या अधिकाºयांच्या नावाचा समावेश होता. मात्र खटला सुरु असताना अमित शहा आणि वंझारा यांच्यासह एकूण १६ आरोपींना पुराव्याअभावी कोर्टाने निर्दोष मुक्त केले. ज्याला सीबीआयनेही सत्र न्यायालयातही आणि हायकोर्टातही विरोध केला नाही.

उरलेल्या २२ आरोपींविरोधात हा खटला चालवण्यात आला, आरोप निश्चित करण्यात आले. यात प्रामुख्याने गुजरात आणि राजस्थान पोलीस दलातील अधिकाऱ्याचा समावेश आहे. यांच्याविरोधात सीबीआयने एकूण २१० साक्षीदार उभे केले होते, ज्यातील तब्बल ९२ साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवल्याने त्यांना फितूर घोषित करण्यात आले.